चेंडू फेरफारप्रकरणी दोषी आढळल्यामुळे निलंबनाची शिक्षा भोगत असलेल्या स्टीव्ह स्मिथ व कॅमरुन बँक्रॉफ्ट यांच्या ताज्या भाष्यामुळे माझ्यासह अनेकांना आश्चर्य वाटले, अशी प्रतिक्रिया माजी क्रिकेटपटू रिकी पाँटिंगने गुरुवारी व्यक्त केली.

मार्च महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात चेंडू फेरफार केल्यामुळे स्मिथ, बँक्रॉफ्टसह डेव्हिड वॉर्नर यांना निलंबनाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्या प्रकरणावर बुधवारी स्मिथ आणि बँक्रॉफ्ट यांनी एका ऑस्ट्रेलियाच्या वृत्तवाहिनीशी संवाद साधला. वॉर्नरने आपल्याला चेंडूशी फेरफार करण्यासाठी भाग पाडले, असे बँक्रॉफ्टने सांगितले, तर स्मिथने ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’वर सामने जिंकण्यासाठी अतिरिक्त दडपण आणले जाते, अशी टीका केली होती.

या संदर्भात पाँटिंग म्हणाला, ‘‘स्मिथ व बँक्रॉफ्टच्या मतामुळे मला आता पुढील काही दिवसांत वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांवर यासंबंधी कशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमटतात, हे पाहायचे आहे. त्यांच्या या प्रत्युत्तरामुळे चाहत्यांच्या भुवया नक्कीच उंचावल्या. मात्र त्यामुळे संघाच्या सद्य:स्थितीवर काही परिणाम पडेल असे वाटत नाही.’’

स्मिथ, बँक्रॉफ्ट यांच्या विधानामुळे वॉर्नरच्या शिक्षेत वाढ नाही -केव्हिन

स्टीव्ह स्मिथ व कॅमरुन बँक्रॉफ्ट यांनी बुधवारी चेंडू फेरफार प्रकरणासंबंधी डेव्हिड वॉर्नरवर केलेल्या विधानामुळे त्याच्या शिक्षेत कोणत्याही प्रकारची वाढ केली जाणार नाही, असे ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी केव्हिन रॉबर्ट यांनी स्पष्ट केले आहे.

‘‘स्मिथ व बँक्रॉफ्ट यांचे विधान कितपत खरे आहे, हे मला ठाऊक नाही. मात्र वॉर्नरशी तीन दिवसांपूर्वीच झालेल्या संवादात मी त्याच्या पुनरागमनाविषयी चर्चा केली. त्यामुळे त्याच्या शिक्षेत भर पडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,’’ असे रॉबर्ट यांनी सांगितले.