भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या यांच्यासारखे फिनिशर ऑस्ट्रेलियाकडे नसल्याचे मत माजी कर्णधार रिकी पाँटिंगने दिले आहे. ऑस्ट्रेलियाला मधल्या फळीत एक फिनिशर मिळाला आणि तो यष्टीरक्षण करू शकत असेल, तर येणाऱ्या टी-२० वर्ल्डकपमध्ये त्याचा फायदा होईल, असेही पाँटिंगने म्हटले.

पाँटिंग म्हणाला, “ऑस्ट्रेलियासाठी फिनिशर्सची भूमिका कायमच चिंताजनक ठरली आहे. यासाठी तीन किंवा चार षटके खेळू शकतील आणि ५० धावा करु शकतील अशा खेळाडूची गरज आहे. धोनीने त्याच्या संपूर्ण कारकीर्दीत हेच काम केले आहे आणि त्यामध्ये तो उत्कृष्ट आहे. हार्दिक पंड्या आणि कायरन पोलार्डही या प्रकारात मोडतात, जे देशासाठी आणि आयपीएल संघासाठी सामने जिंकू शकतात. त्यांना या ठिकाणी खेळण्याची सवय आहे.”

 

हेही वाचा – ‘‘ऋषभ पंतने मध्यरात्री साडेतीन वाजता घरी येऊन माझी माफी मागितली होती”

स्टॉइनिसमध्ये फिनिशर्सची झलक

आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक असणारा पाँटिंग म्हणाला, ”ऑस्ट्रेलियाकडे चांगले फिनिशर नाही, कारण त्याचे सर्व सर्वोत्कृष्ट फलंदाज बिग बॅश लीगमध्ये पहिल्या चार ठिकाणी खेळतात. ग्लेन मॅक्सवेल, मिशेल मार्श, मार्कस स्टोईनिस हे काम करू शकतात. स्टॉइनिसने दिल्लीसाठी फिनिशरची भूमिका योग्य निभावली.”

हेही वाचा – WTC FINAL : टीम इंडियाची नवी ‘RETRO जर्सी’ तुम्ही पाहिली का?

“गेल्या वर्षी मी स्टॉइनिसला दिल्लीसाठी फलंदाजी करताना पाहिले. बिग बॅश लीगच्या काही सामन्यात त्याने डावाची सुरुवात करत मेलबर्न स्टार्ससाठी चांगली कामगिरी केली होती. पण मला असा फलंदाज हवा आहे जो फिनिशरची भूमिका घेऊ शकतो आणि स्टॉइनिसने दिल्ली कॅपिटल्सला दोन-तीन सामने जिंकून दिले होते”, असेही पाँटिंगने सांगितले.