ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटींगने ‘मंकीगेट’ प्रकरण हे कर्णधार म्हणून आपल्यासाठी सर्वात खडतर काळ होता असं म्हटलं आहे. भारतीय संघाच्या २००७-०८ सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात, हरभजन सिंहने ऑस्ट्रेलियन खेळाडू अँड्रू सायमंड्सला माकड (monkey) म्हटल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. हरभजन सिंहने हे आरोप फेटाळले होते. या प्रकरणावर अखेरीस पाँटीगने आपलं मौन सोडलं आहे.

“Monkeygate हा कर्णधार म्हणून माझ्यासाठी सर्वात खडतर काळ होता.२००५ साली आम्ही Ashes मालिका गमावली होती, मात्र त्यानंतरही मी पूर्ण नियंत्रणात होतो. पण मंकीगेट प्रकरणात जे झालं त्यावेळी माझा माझ्यावर ताबा नव्हता. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार म्हणून माझ्यासाठी तो सर्वात खराब काळ होता, या प्रकरणाचे पडसाद नंतरही उमटत होते. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अधिकाऱ्यांशी बोलणं, सुनावणीदरम्यान हजर राहणं या गोष्टी मला अजुनही आठवतात.” आयसीसीच्या समितीसमोर झालेल्या सुनावणीत हरभजन सिंहला दोषी मानत ३ सामन्यांच्या बंदीची शिक्षा सुनावण्यात आली होती.

कर्णधार रिकी पाँटींग, मॅथ्यू हेडन आणि मायकल क्लार्क यांनी सायमंड्सच्या बाजूने साक्ष दिली होती. मात्र या सर्व गोष्टींचा खेळावर परिणाम झाल्याचं पाँटीगने कबूल केलं. या प्रकरणानंतर आम्ही पर्थमध्ये कसोटी सामना खेळला, हा सामना जिंकण्यासाठी आम्ही दावेदार होतो, परंतु या सर्व गोष्टींमुळे आम्ही हा सामना गमावला. पाँटींग Sky Sports वाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होता. मंकीगेट प्रकरणानंतर झालेल्या पर्थ कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ७२ धावांनी मात केली होती.