‘पंटर’ या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या पॉन्टिंगने गेली १७ वर्षे ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटची मनोभावे सेवा केल्यानंतर, पर्थमध्ये सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिस-या कसोटी सामन्यात आज (सोमवार) पाँटिंग आठ धावांवर बाद झाला आणि ही त्याच्या कारकिर्दीतील अखेरची खेळी थरली.
पॉन्टिंगकडून अपेक्षित असलेली कामगिरी त्याला मैदानावर साकारता येत नव्हती, या कारणास्तव त्याने तडकाफडकी गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय जाहीर केला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तिसरी कसोटी ही त्याच्या कारकिर्दीतील अखेरची कसोटी ठरली आहे.  
३८ वर्षांचा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार पॉन्टिंग कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांच्या क्रमवारीत सचिन तेंडुलकरनंतर दुसऱ्या स्थानावर आहे. पर्थमध्येच १९९५ मध्ये श्रीलंकेविरुद्ध पॉन्टिंगने कसोटी पदार्पण केले होते आता त्याच मैदानावर त्याच्या कारकिर्दीचा अस्त झाला. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात पॉन्टिंगला एकदिवसीय संघातून वगळण्यात आले होते. त्यानंतर तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुन्हा कधीच दिसला नाही.
दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी ६३२ धावांचे आव्हान ठेवले असताना, ऑस्ट्रेलियाची तीन बाद ११० अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा पराभव अटळ आहे. आज सकाळी शेन वॉटसन बाद झाल्यानंतर कसोटीमधील शेवटची खेळी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाँटिंगचे दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू आणि स्टेडियमवरील उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. मात्र, पाँटिंगला मोठी खेळी करता आली नाही. तो पीटरसनच्या गोलंदाजीवर कॅलीसकडे झेल देऊन आठ धावांवर बाद झाला.