भारताचा युवा आंतरराष्ट्रीय मास्टर लेऑन ल्युक मेंडोसा याने हंगेरी येथील रिगोचेस आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महोत्सवाचे विजेतेपद मिळवले. या कामगिरीसह ग्रँडमास्टर किताब मिळवण्याच्या दिशेने त्याने पहिला टप्पा पार केला.

१४ वर्षीय मेंडोसाने सहा डाव जिंकत, दोन बरोबरी आणि एका पराभवासह नऊ फे ऱ्यांमध्ये सात गुण मिळवून जेतेपद मिळवले. या स्पर्धेत तीन ग्रँडमास्टरसह १० बुद्धिबळपटू सहभागी झाले होते. गोव्याच्या मेंडोसा (एलो २४९९ रेटिंग गुण) याने विलियम पाश्चलविरुद्धचा पहिला डाव जिंकल्यानंतर त्याला अ‍ॅलेक्स क्रूटूलोव्हिककडून पराभूत व्हावे लागले. तिसरा डाव बरोबरीत सोडवल्यानंतर त्याने सलग पाच डाव जिंकत अग्रस्थान पटकावले. त्याने गुयेन हून मिन्ह हाय आणि डेव्हिड बेरके झ या दोन ग्रँडमास्टर्सवर मात केली. नवव्या डावात त्याला हंगेरीचा ग्रँडमास्टर अ‍ॅडम कोझाकविरुद्ध बरोबरी पत्करावी लागली. कोझाकला अर्ध्या गुणाने मागे टाकत मेंडोसाने जेतेपद पटकावले.

‘‘ही स्पर्धा जिंकल्याने तसेच ग्रँडमास्टर किताबासाठीचा पहिला टप्पा पार केल्याने मी खूश आहे,’’ असे मेंडोसाने सांगितले.