रिहोयांग इली, टेबल टेनिस प्रशिक्षक

भारतात टेबल टेनिससाठी विपुल प्रमाणात नैपुण्य उपलब्ध आहे. मात्र जागतिक स्तरावर अव्वल यश मिळविण्यासाठी त्यांनी आंतर क्लब स्पर्धावर भर दिला पाहिजे असे दक्षिण कोरियाचे ज्येष्ठ  आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक रिहोयांग इली यांनी सांगितले. राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारतीय महिला संघाकरिता इली यांची नियुक्ती  करण्यात आली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय महिलांनी रौप्यपदकाची कमाई केली. तसेच वैयक्तिक विभागातही त्यांनी चांगले यश मिळविले आहे. भारतामधील टेबल टेनिस क्षेत्राविषयी इली यांनी ‘लोकसत्ता’शी केलेली बातचीत.

भारतीय खेळाडूंच्या दर्जाबाबत काय सांगता येईल?

भारताने गेल्या तीन-चार वर्षांमध्ये या खेळात चांगली प्रगती केली आहे. जागतिक स्तरावर चमक दाखविण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. मात्र अधिकाधिक क्लब स्तरावरील स्पर्धाचे आयोजन झाले तर निश्चितच त्यांच्या शैलीत सुधारणा होईल. केवळ आमचे नव्हे तर चीन, जपानचेही अनेक खेळाडू युरोपातील व्यावसायिक क्लबकडून खेळत असतात. त्यामुळे या खेळाडूंना आर्थिक फायदा होतो पण त्याचबरोबर त्यांच्या खेळातही सुधारणा होत असते. अन्य परदेशी खेळाडूंबरोबर खेळण्याची सवय त्यांना होते तसेच हे खेळाडू शारीरिक तंदुरुस्ती व क्षमता वाढविण्यासाठी कसे कष्ट घेतात, कोणता पूरक व्यायाम करतात याचेही ज्ञान त्यांना होऊ शकते.

भारतीय खेळाडूंचा कमकुवतपणा कशात आहे?

भारतीय खेळाडू महत्त्वाच्या सामन्यांचे वेळी मानसिक दडपण घेतात. येथील सांघिक लढतीच्या वेळी नेमके हेच घडले. भारतीय खेळाडूंकडे सिंगापूरच्या खेळाडूंवर मात करण्याची क्षमता होती. या खेळाडूंनी सिंगापूरच्या खेळाडूंवर अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये मात केली आहे. मात्र घरच्या वातावरणात खेळताना त्यांनी विनाकारण दडपण घेतले. त्यामुळे ऐन मोक्याच्या क्षणी त्यांनी अक्षम्य चुका केल्या. त्याचा फायदा सिंगापूरला झाला.

तांत्रिकदृष्टय़ा भारतीय खेळाडू परिपक्व आहेत काय?

भारतीय खेळाडू बॅकहॅण्ड बचावामध्ये कमी पडतात. तसेच काही वेळा टॉपस्पिन फटका मारताना ते खूप घाई करतात. साहजिकच चेंडू नेटमध्ये जातो. असे फटके मारताना अचूकता दाखविली पाहिजे. तसेच रॅली करतानाही त्यांनी योग्य रीतीने नियंत्रण ठेवले पाहिजे. फसव्या सव्‍‌र्हिस करण्याची शैलीही विकसित करण्याची आवश्यकता आहे. ज्याप्रमाणे टेनिसमध्ये बिनतोड सव्‍‌र्हिस करणे महत्त्वाचे असते, तसेच आमच्या खेळातही हुकमी व अचूक सव्‍‌र्हिसला प्राधान्य देण्याची गरज आहे. या सर्व शैली विकसित करण्यासाठी नियमित सरावात अशा सव्‍‌र्हिस करण्यावर भर दिला पाहिजे.

प्रशिक्षकांच्या दर्जाबाबत तुमचे काय मत आहे?

प्रशिक्षकांच्या दर्जात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. तीन-चार राष्ट्रीय स्पर्धा खेळलेले खेळाडू प्रशिक्षक म्हणून काम करण्यास सुरुवात करतात. प्रशिक्षक होण्यापूर्वी स्वत:चा खेळ परिपक्व आहे की नाही याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. जर तुम्हीच तांत्रिकदृष्टय़ा परिपक्व नसाल तर तुमचा खेळाडूही चांगली कामगिरी करू शकणार नाही. प्रशिक्षकांकरिता संघटनेने ठरावीक काळानंतर उद्बोधक शिबीर आयोजित केले पाहिजे. परदेशी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या प्रशिक्षकांकरिता तांत्रिक ज्ञानाबाबत शिबीर घेतले पाहिजे.

खेळाच्या प्रसाराबाबत काय केले पाहिजे?

शालेय स्तरावरील स्पर्धामध्ये नैपुण्य शोध करीत त्यामधून निवडलेल्या खेळाडूंकरिता राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षण शिबिरे घेतली पाहिजेत. या शिबिरांमध्ये या खेळाडूंना स्पर्धात्मक प्रशिक्षण व पूरक व्यायामाबाबत मार्गदर्शन केले पाहिजे. प्रत्येक वयोगटातील संभाव्य दोन-तीन संघ निवडून त्यांना परदेशात प्रशिक्षणाची व स्पर्धामध्ये भाग घेण्याची संधी दिली पाहिजे. त्यामुळे कनिष्ठ गटातील खेळाडू वरिष्ठ गटात येईपर्यंत त्यांच्या खेळात कमालीचा अव्वल दर्जा दिसून येऊ शकेल.