ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडावी, या दृष्टीने येथील पोलीस दल स्फोटके शोधण्यासाठी श्वानपथकाची मदत घेणार आहेत. अतिरेक्यांचे संभाव्य हल्ले होण्याची शक्यता लक्षात घेऊन श्वानांना त्याबाबत प्रशिक्षणही देण्यात आले
आहे.
देशात यापूर्वी कधीही अतिरेकी हल्ले झालेले नाहीत, मात्र ऑलिम्पिकमध्ये अनेक देशांचे खेळाडू व अन्य पदाधिकारी येणार असल्यामुळे कडक सुरक्षा व्यवस्था केली जाणार आहे. श्वानपथक हा त्याचाच एक भाग आहे. रिओतील श्वानपथक समितीतर्फे नुकतेच दोन आठवडय़ांचे शिबीर आयोजित करण्यात आले होते. फ्रान्समधील विशेष पोलीस पथकांमधील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली या पथकास मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरानंतर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर श्वानांनी प्रात्यक्षिकेही सादर केली. पोलीस अधिकाऱ्यांनी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी असलेल्या आसन व्यवस्थेजवळ बॉम्बसदृश वस्तू लपवून ठेवली होती. श्वानांनी ही वस्तू शोधून काढली.
‘‘रिओतील श्वान फ्रान्समधील श्वानांसारखेच बुद्धिमान आहेत. या श्वानांनी प्रशिक्षणाबाबत चांगले सहकार्य केले,’’ असे शिबिराचे मुख्य प्रशिक्षक बी. ख्रिस्तोफर यांनी सांगितले.