ऑलिम्पिकसारख्या प्रतिष्ठेच्या क्रीडा महोत्सवात तिरंगा ध्वज फडकवणे भारतीय खेळाडूंसाठीच खूप अवघड कामगिरी मानली जाते. त्यातही अ‍ॅथलेटिक्ससारख्या पदकांची लयलूट करण्याच्या खेळात भारतीय खेळाडूंना आजपर्यंत पदक मिळविता आलेले नाही. या पाश्र्वभूमीवर मरीयप्पन थांगवेलू व वरुण भाटी यांनी पॅरालिम्पिकमध्ये मिळविलेले हे यश केवळ शारीरिकदृष्टय़ा दिव्यांग असलेल्या खेळाडूंसाठीच नव्हे, तर अन्य सर्वच खेळाडूंसाठी प्रेरणादायक आहे.

थांगवेलूने रिओ येथे सुरू असलेल्या पॅरालिम्पिकमधील उंच उडीत सुवर्णपदक जिंकले तर वरुणने याच गटात कांस्यपदक मिळवत भारतीयांसाठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. थांगवेलू हा केवळ पाच वर्षांचा असताना एका अपघातामुळे त्याला उजवा पाय गमवावा लागला. वरुणला पोलिओसारख्या आजारामुळे दिव्यांगत्व आले. या दोन्ही खेळाडूंनी अनेक अडचणींवर मात करीत अ‍ॅथलेटिक्समध्ये कारकीर्द घडवली आणि पॅरालिम्पिकमध्ये पदकांपर्यंत झेप घेतली आहे.

संघटनात्मक स्तरावरील प्रचंड वाद व एकाच खेळाच्या दोन-दोन संघटना हा भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी शापच ठरला आहे. पॅरालिम्पिकसुद्धाही त्यास अपवाद राहिलेली नाही. या संघटनेतही खूप अंतर्गत वादविवाद आहेत. पॅरा राष्ट्रीय स्पर्धेच्या वेळी खेळाडूंची अतिशय गैरव्यवस्था झाली होती. लिफ्ट नसलेल्या तीन-चार मजली इमारतींमध्ये या खेळाडूंची निवास व्यवस्था करण्यात आली होती. प्रसाधनगृहांची दैन्यावस्था, मैदानांवरही अनेक त्रुटी, पिण्याच्या पाण्याचीही दुरवस्था अशा अतिशय प्रतिकूल स्थितीत गत वेळी राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. साहजिकच पारा खेळाडूंना विलक्षण शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला होता. खेळाडूंनी संयोजकांविरुद्ध आपले गाऱ्हाणे केवळ केंद्रीय क्रीडा मंत्रालयापर्यंत नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक महासंघापुढेही मांडले. त्यामुळे राष्ट्रीय पॅरा ऑलिम्पिक असोसिएशनवर बंदीची कुऱ्हाड आली. या बंदीमुळे भारतीय खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धामधील सहभागाबाबत समस्या निर्माण झाल्या. मात्र केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने मध्यस्थी केल्यानंतर या खेळाडूंच्या पॅरालिम्पिकमधील सहभागाची समस्या दूर झाली.

असे असले तरी पालकच नाही अशा अवस्थेत भारताचे १९ खेळाडू यंदाच्या पॅरा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले. या प्रत्येक खेळाडूंचा पूर्वेतिहास पाहिला तर या खेळाडूंना केवळ क्रीडा क्षेत्रातील नव्हे तर सामान्य जीवन जगतानाही किती संघर्ष करावा लागत असतो, याची कल्पना येऊ शकते. परदेशी प्रशिक्षक, परदेशातील स्पर्धामधील सहभाग, फिजिओ, मसाजिस्ट, क्रीडा आहारतज्ज्ञ, क्रीडा वैद्यकतज्ज्ञ, क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ, शासकीय अर्थसाहाय्य अशा अनेक सुविधा पायाशी लोळण घालत असतानाही आपले काही अ‍ॅथलिट ऑलिम्पिकमध्ये स्वत:च्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीपेक्षा किंवा राष्ट्रीय विक्रमापेक्षाही खराब कामगिरी करून रिकाम्या हाताने ऑलिम्पिकहून परत येतात. भरपूर पगाराची नोकरी व बहुतांश वेळी सरावासाठीच कामावरून सवलत मिळविणारे भारताचे अनेक अ‍ॅथलिट ऑलिम्पिकमध्ये प्राथमिक फेरीच्या पुढेही जाऊ शकत नाहीत किंवा पहिल्या पंचवीस खेळाडूंमध्येही स्थान मिळवू शकत नाहीत. या पाश्र्वभूमीवर फारशा सोयी व सुविधा उपलब्ध नसताना थांगवेलू व भाटी यांनी मिळविलेले यश खरोखरीच अतुलनीय आहे. या खेळाडूंना आर्थिक पाठबळ उभारण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला आहे. थांगवेलूच्या कुटुंबीयांनी त्याची अ‍ॅथलेटिक्स कारकीर्द घडावी यासाठी कर्ज घेतले आहे व अजूनही हे कर्ज ते फेडत आहेत.

भारताच्या गिरीशा नागराजेगौडा याने लंडन येथे चार वर्षांपूर्वी झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये उंच उडीतच रौप्यपदक मिळविले होते. मात्र त्याला अर्जुन पुरस्कारासाठी झगडावे लागले होते. तसेच चांगल्या नोकरीसाठीही त्याला वणवण करावी लागली होती. थांगवेलू व भाटी यांना तरी सन्मानपूर्वक वागणूक मिळाली पाहिजे. खरं तर अशा पदकविजेत्या खेळाडूंवरही पारितोषिकांचा वर्षांव व्हायला पाहिजे. दिव्यांग असले तरी त्यांनी पॅरालिम्पिकमध्ये पदक मिळविले आहे ही काही सोपी गोष्ट नाही. अथक मेहनत, महत्त्वाकांक्षा व जबरदस्त आत्मविश्वास या जोरावरच या दोन्ही खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. दिव्यांग आहेत म्हणून ते कधी रडत बसले नाहीत किंवा जाहीररीत्या तक्रार करीत बसले नाहीत. उपलब्ध असलेल्या सुविधांवर समाधान मानत त्यांनी यश मिळविले आहे. या काही गोष्टी त्यांच्याकडून शिकण्यासारख्या नक्कीच आहेत.

राष्ट्रपती व पंतप्रधानांकडून अभिनंदन

  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध नामवंत व्यक्तींनी मरियप्पन व भाटी यांचे अभिनंदन केले आहे.
  • प्रणब मुखर्जी : या दोन्ही खेळाडूंची कामगिरी अन्य खेळाडूंसाठी प्रेरणादायक आहे. या खेळाडूंनी भविष्यातही अशीच कामगिरी करावी. त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत.
  • नरेंद्र मोदी : भारतवासीयांसाठी अभिमानास्पद हे यश आहे. या दोनही खेळाडूंनी देशाचा तिरंगा पॅरा ऑलिम्पिकमध्ये फडकावीत युवा खेळाडूंसाठी आदर्श निर्माण केला आहे.
  • केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल : आमच्यासाठी अतिशय आनंददायी कामगिरी आहे. सव्वाशे कोटी भारतीय लोकांना कौतुक वाटेल असेच या दोन्ही खेळाडूंचे यशआहे.
  • ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती साक्षी मलिक : भारतात ऑलिम्पिकसारख्या महत्त्वपूर्ण स्पर्धामध्ये पदक मिळवून देण्यासाठी विपुल नैपुण्य उपलब्ध आहे, हेच या दोन्ही खेळाडूंनी दाखवून दिले आहे.

 

– मिलिंद ढमढेरे

milind.dhamdhere@expressindia.com