भारताच्या मरियप्पन थांगवेलूने पुरुषांच्या उंच उडीत सुवर्णपदक जिंकून पॅरालिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. या क्रीडाप्रकारात भारताच्याच वरुण भाटीने कांस्यपदक मिळवले.

पॅरा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविणारा आजपर्यंतचा तो तिसरा भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी मुरलीकांत पेटकर (१९७२- जलतरण) व देवेंद्र झाझरिया (२००४- भालाफेक) यांनी सुवर्णपदक जिंकले होते. प्रथमच एकाच क्रीडाप्रकारात भारताला सुवर्ण व कांस्य अशा दोन पदकांची कमाई झाली आहे.

मरियप्पनने १.८९ मीटपर्यंत उडी मारली व अमेरिकेचा विश्वविजेता खेळाडू सॅम ग्रेवे याच्यावर मात केली. सॅमने १.८६ मीटपर्यंत उडी मारली आणि रौप्यपदक मिळविले. भाटीनेही तेवढीच उडी मारली. मात्र त्याच्यापेक्षा कमी प्रयत्नांमध्ये सॅमने उडी मारल्यामुळे त्याला रौप्य व भाटी याला कांस्यपदक देण्यात आले.

भारताचा शरदकुमार हादेखील याच क्रीडाप्रकारात सहभागी झाला होता. त्याने १.७७ मीटपर्यंत उडी मारली व सहावे स्थान मिळवले.

भारताच्या संदीप व नरेंदर रणबीर यांना भालाफेकीत पदकाने हुलकावणी दिली. संदीपने ५४.३० मीटपर्यंत भालाफेक करीत चौथे स्थान घेतले. रणबीर याने ५३.७९ मीटपर्यंत भालाफेक केली व सहावा क्रमांक मिळविला.

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा, माजी आंतरराष्ट्रीय हॉकीपटू वीरेन रस्किना, केंद्रीय गृह खात्याचे राज्यमंत्री किरेन रिज्जू, अभिनेते अमिताभ बच्चन यांनीही या खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

तामिळनाडूतर्फे थांगवेलूस दोन कोटी रुपये

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी मरियप्पनला दोन कोटी रुपयांचे पारितोषिक जाहीर केले. त्यांनी सांगितले, ‘पॅरालिम्पिकच्या इतिहासात प्रथमच उंच उडीत भारताला सुवर्णपदक मिळाले आहे. ही कामगिरी करणारा मरियप्पन हा आमच्या राज्यातील खेळाडू आहे, ही आमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.