यष्टीरक्षक ऋषभ पंतचं फलंदाजी आणि यष्टीरक्षणात फॉर्मात नसणं ही गेल्या काही महिन्यांमधली भारतीय संघाची प्रमुख समस्या बनली आहे. लंकेविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यात ऋषभला फलंदाजीतलं आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली नाही. मात्र २०१९ विश्वचषकानंतर मिळत आलेल्या संधी ऋषभने हाराकिरीने वाया घालवल्या. ज्यामुळे ऋषभला विश्रांती देऊन धोनी किंवा सॅमसनला संघात जागा देण्याची मागणी मध्यंतरी होत होती. मात्र निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाने पंतवरचा आपला विश्वास कायम ठेवला. आता बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनीही पंतची पाठराखण केली आहे.
ऋषभच्या खराब कामगिरीमुळे त्याला कसोटी मालिकेत विश्रांती देऊन वृद्धीमान साहाला संधी देण्यात आली. मात्र सौरव गांगुलीच्या मते पंतला आता कसोटी संघातही संधी मिळायला हवी. “कोणत्या खेळाडूची संघात निवड करायची आणि कोणाची नाही हे निर्णय निवड समितीच्या हातात असतात. मात्र ऋषभ पंत हा संघातला Special Talent आहे, विंडीजविरुद्ध मालिकेत तो चांगला खेळला हे आपण सर्वांनी पाहिलं आहे. कसोटी क्रिकेटमधली त्याची कामगिरीही चांगली राहिलेली आहे. मात्र संघात कोणाला जागा द्यायची आणि कोणाला नाही याचा अंतिम निर्णय हा निवड समितीकडेच असेल.” टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राशी बोलत असताना गांगुलीने आपली भूमिका मांडली.
काही दिवसांपूर्वी भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मानेही ऋषभची पाठराखण केली होती. श्रीलंका दौऱ्यानंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे मालिका खेळेल. यानंतर भारतीय संघासमोर न्यूझीलंडचं आव्हान असणार आहे. त्यामुळे दरम्यानच्या काळात ऋषभच्या कामगिरीत सुधारणा होते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
अवश्य वाचा – लोकं बोलत राहतील, तू लक्ष देऊ नकोस ! ऋषभ पंतची रोहितकडून पाठराखण
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 8, 2020 12:48 pm