दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यामध्ये दुखापतग्रस्त झाल्यानंतर Delhi Capitals समोर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. श्रेयसच्या अनुपस्थितीत यंदाच्या IPL 2021 मध्ये दिल्लीचं नेतृत्व कोण करणार? याचं उत्तर शोधणं कठीण झालं होतं. मात्र अखेर अजिंक्य रहाणे, स्टीव्ह स्मिथ, आर अश्विन यांच्या नावांमधून Rishabh Pant चं नाव अंतिम करण्यात आलं आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेमध्ये रिषभ पंतनं दाखवलेल्या मर्दुमकीच्या जोरावर त्याला कर्णधारपद मिळाल्याची भावना त्याच्या चाहत्यांकडून आता व्यक्त होताना दिसत आहे. त्यामुळे डावखुऱ्या रिषभ पंतचा जलवा आयपीएलमध्ये पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक झाले आहेत.

 

इंग्लंडविरुद्ध झालेल्या पहिल्याच एकदिवसीय सामन्यामध्ये श्रेयस अय्यर मैदानावर बॉल थांबवताना दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे श्रेयस अय्यर मालिकेतल्या उर्वरीत दोन्ही सामन्यांना मुकला होता. शिवाय, तो आयपीएलमध्येही खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यामुळे ऐन आयपीएलच्या तोंडावर दिल्लीसाठी नवा कर्णधार ठरवण्याचं आव्हान संघ व्यवस्थापनावर येऊन पडलं होतं. श्रेयस अय्यरनंच Delhi Capitals ला गेल्या सीजनमध्ये आयपीएलच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवलं होतं.

 

दुसराच सामना दिल्लीचा!

यंदाच्या आयपीएलला ९ एप्रिलपासून सुरुवात होत आहे. गतविजेते Mumbai Indians आणि ‘विराट सेना’ Royal Challengers Bangalore यांच्यामध्ये सलामीचा सामना होणार आहे. त्यानंतर दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि धोनी ब्रिगेट चेन्नई सुपर किंग्ज एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. त्यामुळे रिषभ पंतला धोनी ब्रिगेडशी दोन हात करण्यासाठी रणनीती करावी लागणार आहे.