श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्यानंतर आयपीएल २०२१ मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी भारताचा डावखुरा फलंदाज आणि विकेट कीपर रिषभ पंत याच्याकडे सोपवण्यात आली आहे. Delhi Capitals नं त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवरून यासंदर्भातली घोषणा केली आहे. कर्णधारपदी निवड झाल्यानंतर रिषभ पंतनं इंडिया टुडेशी बोलताना आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “एक दिवस दिल्लीचं नेतृत्व करावं, हे स्वप्न मी आजपर्यंत पाहात आलो आहे. आणि आज ते स्वप्न सत्यात उतरलं आहे. मी त्यासाठी खूप आनंदी आहे”, अशी प्रतिक्रिया रिषभ पंतनं दिली आहे.

“दिल्लीतच मी वाढलो, मोठा झालो!”

कर्णधारपदाविषयी बोलताना रिषभ पंत म्हणाला, “दिल्लीतच मी वाढलो आणि मोठा झालो. सहा वर्षांपूर्वी दिल्लीतूनच माझ्या IPL करिअरला सुरुवात झाली. या टीमचं नेतृत्व करणं हे स्वप्न मी आजपर्यंत पाहात आलो आहे. ते आज सत्यात उतरलं आहे. मला त्याचा खूप आनंद आहे. मी संघव्यवस्थापनाचा आभारी आहे की त्यांनी कर्णधारपद सांभाळण्यासाठी मला योग्य मानलं आणि मला ही संधी दिली”, असं रिषभ म्हणाला.

सर्वोत्तम कामगिरीसाठी उत्सुक!

दरम्यान, आपण सर्वोत्तम कामगिरीसाठी उत्सुक असल्याचं रिषभ म्हणाला आहे. “उत्तम कोचिंग स्टाफ आणि दिग्गज वरीष्ठ खेळाडू सोबत असल्यामुळे दिल्ली कॅपिटल्ससाठी माझी सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी मी उत्सुक आहे”, असं रिषभ म्हणाला आहे.

अखेर ठरलं; Rishabh Pant करणार आयपीएल २०२१मध्ये Delhi Capitals चं नेतृत्व!

रिषभ पंतची IPL मधील कामगिरी!

रिषभ पंतनं आत्तापर्यंत आयपीएलमध्ये आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली आहे. IPL मध्ये रिषभनं आत्तापर्यंत ६८ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने तब्बल २ हजार ७९ धावा फटकावल्या आहेत. त्यात तब्बल १८३ चौकार आणि १०३ षटकारांचा समावेश आहे. शिवाय १२ अर्धशतकं आणि एका तडाखेबाज शतकाचा देखील त्यात समावेश आहे. ३५.२३ च्या सरासरीने रिषभनं या धावा केल्या असून नाबाद १२८ ही त्याची आयपीएलमधली सर्वोत्तम धावसंख्या राहिली आहे. आत्तापर्यंत रिषभ पंतनं ४६ झेल देखील पकडले आहेत.