भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंतने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीमध्ये दमदार शतक ठोकले. अवघ्या १३८ चेंडूंमध्ये पंतने कारकिर्दीमधील दुसरे शतक ठोकले. या शतकाबरोबरच पंतने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेमध्ये धावांच्या शर्यतीमध्ये विराट कोहलीलाही मागे टाकले आहे. पंतची शतकी धाव ही मालिकेमधील त्याची २९१ वी धाव ठरली. तर विराटने आत्तापर्यंत या मालिकेत एकूण २८२ धावा केल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेमध्ये पंत गाजतोय तो त्याच्या बडबडेपणामुळे. यष्ट्यांमागून ऑस्ट्रेलियन खेळाडूंबद्दल शेरेबाजी करणारा पंत अनेकांना आवडला तर अनेकांना खटकलाही. मात्र याबरोबरच पंतने खेळामध्येही चांगली सुधारणा केल्याचे दिसत आहे. यष्ट्यांमध्ये सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम पंतने या मालिकेत आधीच आपल्या नावावर केला आहे. तर दुसरीकडे त्याने मालिका सुरु झाल्यापासूनच सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत आक्रमक खेळीवर भर दिला आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटीत पहिल्या डावात २५ तर दुसऱ्या डावात २८ धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या कसोटीमध्ये ३६ आणि ३० धावांची खेळी केली. तिसऱ्या कसोटीमध्येही त्याने पटापट धावा करत ३९ आणि ३३ धावांची खेळी केली. तर चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात पंतने थेट शतकच ठोकले आहे. पुजाराचे शतक अवघ्या ७ धावांने हुकले असतानाचा पंतने शतक साजरे करत भारतीय चाहत्यांना सुखद धक्का दिला.

पंतच्या फलंदाजीमध्ये दिवसोंदिवस सुधारणा  होत असून सातव्या क्रमांकाला फलंदाजीला येऊन आक्रामक खेळ करत तो डावाला गती देत असल्याने संघाला त्याचा फायदा होताना दिसत आहे.