भारताचा उदयोन्मुख क्रिकेटपटू पंतची भावना

पोर्ट ऑफ स्पेन : आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची सुरुवात केल्यापासून प्रत्येक दिवशी क्रिकेटपटू आणि माणूस म्हणून मी सुधारण्याचा प्रयत्न करतो आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा उदयोन्मुख खेळाडू ऋषभ पंतने बुधवारी व्यक्त केली.

एकीकडे सर्वाधिक अनुभवी क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी निवृत्तीकडे वाटचाल करीत असताना २१ वर्षीय पंतकडे भारताचे भविष्य म्हणून पाहिले जात आहे. परंतु वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत आणि विश्वचषकातील उपांत्य सामन्यात त्याचा अतिआक्रमकपणा आणि चुकलेली फटक्यांची निवड संघाला हानीकारक ठरल्यामुळे अनेकांनी त्याच्यावर टीका केली. पुढील सहा महिन्यांच्या कालावधीत भारताला अनेक मालिका खेळायच्या असल्याने पंतला कामगिरी सुधारण्याची आवश्यकता आहे.

‘‘माझ्यासाठी प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे. मी फक्त पुढील सहा महिन्यांचा विचार करत नसून आयुष्यातील प्रत्येक दिवशी मला क्रिकेटपटू आणि एक माणूस म्हणून कशा प्रकारे सुधारता येईल, याविषयी विचार करतो,’’ असे पंत म्हणाला. पंतने ट्वेन्टी-२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात अर्धशतक साकारले होते; परंतु ती खेळी वगळता त्याने चौथ्या स्थानावर फारशी चमक दाखवलेली

नाही.

‘‘खेळाडू म्हणून मला प्रत्येक वेळी मैदानावर फलंदाजीला उतरल्यावर शतक झळकावण्याची इच्छा होते. परंतु सध्या मी त्यावर लक्ष देत नसून खेळपट्टीवर ठाण मांडण्यावर भर देत आहे. गेल्या काही सामन्यांत मी चांगली सुरुवात मिळूनही त्याचे मोठय़ा खेळीत रूपांतर करू शकलो नाही,’’ असेही पंतने सांगितले.

श्रेयसशी माझी कोणतीही स्पर्धा नाही!

चौथ्या स्थानासाठी पंत आणि श्रेयस अय्यर यांच्यापैकी योग्य फलंदाज कोण, याविषयी गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगली आहे. परंतु पंतने मात्र श्रेयसशी माझी कोणतीही स्पर्धा नाही, असे सांगितले आहे.

‘‘श्रेयस व मी २०१४च्या युवा विश्वचषकापासून एकत्र खेळत असून दोघेही एकमेकांचे घनिष्ठ मित्र आहोत. त्यामुळे आमची एकमेकांशी कोणतीही स्पर्धा नसून आमच्यात तुलना करणेही मूर्खपणाचे ठरेल. संघ व्यवस्थापनाने दिलेल्या क्रमानुसार प्रत्येक फलंदाजाला त्याच्यावरील जबाबदारीची जाणीव आहे. त्यामुळे कोणता फलंदाज कोणत्या स्थानावर फलंदाजी करतो, याविषयी मी फारसा विचार करत नाही,’’ असे पंतने सांगितले.