भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. १५ ऑगस्टच्या संध्याकाळी धोनीने आपली निवृत्ती जाहीर केली. त्याआधी सुमारे वर्षभर धोनी भारतीय संघाबाहेर होता. २०१९ विश्वचषक स्पर्धेत उपांत्य सामन्यात भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर तत्कालीन निवड समिती प्रमुख एम.एस.के. प्रसाद यांनी धोनी आता भारतासाठी पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक नसेल असं जाहीर केलं. यानंतर ऋषभ पंतला भारतीय संघात संधी देण्यात आली. परंतू यानंतरच्या काळात ऋषभ पंत सतत अपयशी होत राहिला. निवड समितीचे माजी प्रमुख एम.एस.के. प्रसाद यांनी Sportskeeda संकेतस्थळाशी बोलत असताना पंतच्या अपयशामागचं कारण सांगितलं.

“ज्यावेळी ऋषभ पंत मैदानात उतरायचा त्यावेळी त्याची तुलना धोनीसोबत होत होती, आणि अनेकदा तो देखील यात ओढला गेला असं मला वाटतं. आम्ही अनेकदा त्याच्याशी बोलायचो आणि त्याला सांगायचो की तुला यामधून बाहेर यायला हवं. धोनी हा संपूर्णपणे वेगळा खेळाडू आहे आणि तू वेगळा खेळाडू आहेस. तुझ्यातही तेवढी गुणवत्ता आहे म्हणून आम्ही तुला पाठींबा देतोय. संघ व्यवस्थापनातली लोकंही त्याला हे नेहमी सांगायची. परंतू तो नेहमी धोनीच्या छायेत वावरला. नकळत त्यानेही स्वतःची तुलना धोनीशी करायला सुरुवात केली. यष्टीरक्षणातही त्याने धोनीची कॉपी करायला सुरुवात केली. यष्टींमागे सामन्यात पंत काय करत असतो हे तुम्ही पाहिलं असेल तर तुम्हाला मी काय म्हणतोय हे लक्षात येईल.” प्रसाद यांनी ऋषभ पंत अपयशी होण्यामागचं कारण सांगितलं.

सातत्याने खराब कामगिरी केल्यामुळे अखेरीस भारतीय संघाने टी-२० क्रिकेटमध्ये पंतला विश्रांती देऊन लोकेश राहुलला संघात यष्टीरक्षणाची जबाबदारी दिली. जर पंत यातून लवकर बाहेर आला नाही तर तो टी-२० संघातलं आपलं स्थान गमावून बसेल अशी भीती प्रसाद यांनी व्यक्त केली. २०१८ साली ऋषभला पहिल्यांदा भारतीय कसोटी संघात स्थान मिळालं. इंग्लंड दौऱ्यात ऋषभने पहिल्यांदाच शतक झळकावत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात झळकावलेल्या शतकाच्या जोरावर पंत हा भारतीय संघात धोनीचा वारसदार म्हणून ओळखला जाऊ लागला. परंतू दुर्दैवाने मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचलता न आल्यामुळे सध्या पंतला लोकेश राहुल आणि संजू सॅमसन यांच्याशी स्पर्धा करावी लागते आहे.