भारतीय संघ २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभूत झाला. त्या सामन्यात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी धावबाद झाला आणि भारताच्या विजयाच्या आशा मावळल्या. या सामन्यानंतर धोनी क्रिकेटपासून दूरच आहे. भारताच्या वन-डे संघात धोनीऐवजी ऋषभ पंत याला यष्टीरक्षक म्हणून पहिली पसंती असेल असे २०१९ च्या विश्वचषकानंतर स्पष्ट करण्यात आले होते. पण त्यानंतर झालेल्या १० महिन्यांच्या क्रिकेटमध्ये पंत सातत्याने अपयशी ठरला. पंतला अनेक वेळा संधी दिल्यानंतरही त्याच्या खेळात फारशी सुधारणा दिसून आली नाही. पंतच्या या अपयशाचे नेमके कारण माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याने सांगितले आहे.

“ऋषभ पंत हा स्वैरपणे फटकेबाजी करणारा खेळाडू आहे. तुम्हाला त्याच्या फलंदाजीचा क्रमांक नक्की केला पाहिजे आणि त्याला किती चेंडू खेळायला मिळाले पाहिजेत हेदेखील ठरवलं पाहिजे. तो कितव्या क्रमांकावर फलंदाजी करेल आणि किती चेंडू खेळेल हे नक्की ठरलं की त्याच्या डोक्यातही स्पष्टता येईल. आपल्याला किती चेंडू खेळायला मिळणार आहेत याचा त्याला अंदाज असेल तर एकेरी धाव घेऊ की बचावात्मक खेळू या द्वंदामध्ये तो अडकणार नाही. तो आक्रमक फलंदाज आहे. त्यामुळे त्याने त्याच्या नैसर्गिक खेळीनुसार फटकेबाजी करत खेळणंच अपेक्षित आहे”, असे मत कैफने समालोचक आकाश चोप्रा याला मुलाखत देताना मांडले.

“दिल्ली कॅपिटल्स संघाचं उदाहरण घ्या. पंतला तिसऱ्या क्रमांकावर खेळवावे की चौथ्या? यावरून गांगुली, मी आणि रिकी पॉन्टींग आम्हा तिघांच्यात चर्चा झाली. पण नंतर आम्ही असं ठरवलं की पंतला कमीत कमी ६० चेंडू खेळायला मिळावले हवेत. तो कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करतोय त्याचा विचार न करता किमान शेवटची १० षटके तो मैदानावर असायला हवा. अशा प्रकारचा निर्णय टीम इंडियाने अद्यापही घेतलेला नाही. त्यामुळे तो सातत्याने अपयशी ठरतो आहे”, असेही त्याने सांगितले.