भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरूद्धची कसोटी मालिका २-१ने जिंकली आणि इतिहास रचला. अनेक खेळाडू दुखापतग्रस्त झालेले असूनही भारताच्या नव्या दमाच्या खेळाडूंनी सामना जिंकवून दिला. चौथ्या डावात ३२८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शुबमन गिलने ९१ तर चेतेश्वर पुजाराने ५६ धावांची खेळी केली. पण ऋषभ पंतची फटकेबाज खेळी खऱ्या अर्थाने निर्णायक ठरली. भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर BCCIने संघाला ५ कोटींचा बोनस जाहीर केला. त्यामुळे आता ऋषभ पंत नवीन घर खरेदी करण्याच्या विचारात आहे. त्यावरून चाहते आणि नेटकरी त्याला भन्नाट पर्याय सुचवताना दिसत आहेत.

ऋषभ पंतने आपल्या ट्विटरवरून चाहत्यांना एक प्रश्न विचारलं. “जेव्हापासून ऑस्ट्रेलियाहून घरी परतलो आहे तेव्हापासून घरची मंडळी मागे लागली आहेत की आता नवीन घर खरेदी करून टाक. (चाहत्यांनो, तुम्हाला काय वाटतं?), गुरगांवला घर घेणं योग्य ठरेल का? अजून कोणते पर्याय असतील तर मला सांगा”, असं ट्विट पंतने केलं.

पंतच्या या ट्विटनंतर नेटीझन्सने त्याला भन्नाट रिप्लाय देण्यास सुरूवात केली. एकाने त्याला थेट पाकिस्तान विकत घेण्याचा सल्ला दिला. ‘माझ्या हृदयात तुम्ही मोफत राहता.. घराची काय गरज’, अशा आशयाच्या कमेंट्स तरूणींकडून पाहायला मिळाल्या. तरूण आणि तरूणींव्यतिरिक्त माजी क्रिकेटपटू इरफान पठाण यानेही मजेशीर कमेंट केली. त्याने पंतला थेट क्रिकेटचं मैदानाचं विकत घेण्यास सांगितलं. पाहूया चाहत्यांचे काही भन्नाट रिप्लाय…

दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या शेवटच्या सामन्यात ऋषभ पंतने दमदार फलंदाजी केली. मुख्य म्हणजे पंतने नाबाद राहून भारताला सामना जिंकवून दिला. त्याने ९ चौकार आणि एक षटकार खेचत नाबाद ८९ धावा केल्या.