News Flash

धोनी पुण्यासाठी तारणहार!

हैदराबादवर शेवटच्या चेंडूवर रोमहर्षक विजय

महेंद्रसिंग धोनी

हैदराबादवर शेवटच्या चेंडूवर रोमहर्षक विजय

सलामीवीर राहुल त्रिपाठीने केलेल्या झंझावती अर्धशतकापाठोपाठ महेंद्रसिंग धोनीने ‘तारणहार’चा करिश्मा दाखवला. त्यामुळेच रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघास सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आयपीएलच्या सामन्यात शेवटच्या चेंडूवर थरारक विजय नोंदवता आला. विजयासाठी आवश्यक असणारे १७७ धावांचे लक्ष्य त्यांनी २० षटकांत व सहा विकेट्स राखून पार केले. गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर उपस्थित असलेल्या वीस हजारांहून अधिक क्रिकेटचाहत्यांना खऱ्या अर्थाने रोमहर्षक खेळाचा आनंद घेता आला.

मोझेस हेन्रिक्सने (२८ चेंडूंत नाबाद ५५) झंझावाती अर्धशतक टोलवताना दीपक हुडाच्या (१० चेंडूंत नाबाद १९) साथीने केवळ २१ चेंडूंत ४७ धावांची अखंडित भागीदारी केली. त्यामुळेच हैदराबाद संघाला २० षटकांत ३ बाद १७६ धावांचा पल्ला गाठता आला. त्यांच्या या भागीदारीसह हैदराबादने शेवटच्या पाच षटकांत ६३ धावा वसूल केल्या. त्रिपाठीने शानदार ५९ धावांची खेळी करीत पुण्याच्या विजयाचा पाया रचला. मात्र त्यानंतर धावांचा वेग कमी झाल्यानंतर धोनी हा पुण्याच्या विजयासाठी धावून आला. त्याने पाच चौकार व तीन षटकारांची जादू दाखवत नाबाद ६१ धावा केल्या. तोच सामनावीर ठरला, त्याला मनोज तिवारीने नाबाद १७ धावा करीत योग्य साथ दिली. या जोडीने ३.५ षटकांत ५८ धावांची भर घातली व विजयश्री खेचून आणली.

पुण्याने भरवशाचा फलंदाज अजिंक्य रहाणेला (२) लवकर गमावले, मात्र राहुल त्रिपाठीने ‘पॉवरप्ले’चा एकहाती फायदा घेताना तडाखेबाज खेळ केला. त्यामुळे पुण्याला पहिल्या ६ षटकांत १ बाद ५५ धावा करता आल्या. स्मिथने ११व्या षटकांत बिपुल शर्माला लागोपाठ दोन षटकार खेचले, मात्र त्रिपाठी व स्मिथ यांची जोडी रंगात आली असतानाच स्मिथचा २७ धावांवर त्रिफळा उडाला. त्याच्यापाठोपाठ पुण्याने त्रिपाठीलाही गमावले. त्रिपाठीने ४१ चेंडूंमध्ये ६ चौकार व ३ षटकारांसह ५९ धावा केल्या. त्याचे हे या स्पर्धेतील पहिलेच अर्धशतक आहे.

त्याआधी, हैदराबाद संघाच्या डेव्हिड वॉर्नर व शिखर धवन या जोडीवर पुण्याच्या गोलंदाजांनी पॉवरप्लेमध्ये बऱ्यापैकी अंकुश ठेवला होता. त्यामुळेच या जोडीला ४५ धावांवर समाधान मानावे लागले. पुण्याचा इम्रान ताहीरने धवनला बाद करीत हैदराबादला पहिला धक्का दिला. धवनने ५ चौकारांसह ३० धावा केल्या व वॉर्नरच्या साथीने सलामीसाठी ५५ धावा केल्या. केन विल्यमसनने एक चौकार व एक षटकारासह झकास सुरुवात केली, मात्र तो खेळपट्टीवर स्थिरावण्यापूर्वीच डॅनियल ख्रिस्तियनने त्याला २१ धावांवर तंबूत धाडले. एका बाजूने आश्वासक, परंतु सावध फलंदाजी करणारा वॉर्नर हा अर्धशतकापूर्वीच तंबूत परतला. त्याने ४० चेंडूंमध्ये ४३ धावा केल्या. तो बाद झाला त्या वेळी हैदराबादची १६.३ षटकांत ३ बाद १२९ अशी स्थिती होती, मात्र त्यानंतर हेन्रिक्स व हुडा यांनी मैदान दणाणून सोडताना पुण्याची गोलंदाजी फोडून काढली.

संक्षिप्त धावफलक

सनरायझर्स हैदराबाद : २० षटकांत ३ बाद १७६ (मोझेस हेन्रिक्स नाबाद ५५, डेव्हिड वॉर्नर ४३; इम्रान ताहीर १/२३) पराभूत वि. रायझिंग पुणे सुपरजायंट्स : २० षटकांत ४ बाद १७९  (महेंद्रसिंग धोनी नाबाद ६१, राहुल त्रिपाठी ५९; रशीद खान १/१७)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2017 2:16 am

Web Title: rising pune supergiant beat sunrisers hyderabad ms dhoni
Next Stories
1 भारतीय संघाची अग्निपरीक्षा
2 बेंगळूरुपुढे  कोलकाताच्या गोलंदाजांची कसोटी
3 पंजाब रैनाला रोखणार?
Just Now!
X