राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर उच्च न्यायालयाने इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेतील मुंबई आणि पुणे येथील लढत राज्याबाहेर स्थलांतरित करण्याचा आदेश दिला. या निर्णयानंतरही बीसीसीआयने महाराष्ट्रदिनी गहुंजे येथे होणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स लढतीच्या आयोजनाची परवानगी मागितली. न्यायालयाने देखील विशेष बाब म्हणून या लढतीच्या आयोजनाला परवानगी दिली. राज्यातल्या आयपीएलमधील शेवटच्या लढतीत आणि महाराष्ट्रदिनी महामुकाबल्यात वर्चस्व गाजवण्यासाठी मुंबई आणि पुणे संघ सज्ज झाले आहेत.
घरच्या मैदानावर पुण्याचा हा चौथा सामना आहे. पहिल्या तीनही सामन्यांत पुण्यास विजय मिळविता आलेला नाही. या स्पर्धेत आतापर्यंत पुण्याचे सात सामने झाले आहेत. त्यापैकी पाच सामन्यांमध्ये त्यांना हार स्वीकारावी लागली होती. या स्पर्धेच्या उद्घाटन सामन्यात पुण्याने मुंबईवर एकतर्फी मात केली होती. हैदराबाद सनराईजविरुद्ध त्यांना डकवर्थ लुईसच्या नियमाचा फायदा झाला होता व त्यांनी हा सामना जिंकला होता. या दोन सामन्यांचा अपवाद वगळता पुण्याची कामगिरी अपेक्षेइतकी झालेली नाही. भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या पुणे संघाकडून अपेक्षेइतके सांघिक कौशल्य दिसलेले नाही.
मुंबई व पुणे या दोन्ही महाराष्ट्राच्या संघांमध्ये महाराष्ट्रदिनाच्या दिवशी हा सामना होत आहे. या सामन्यास भरपूर गर्दी होईल अशी अपेक्षा आहे. घरच्या प्रेक्षकांसमोर पुण्याचा हा अखेरचा सामना आहे. या सामन्यात पुण्याने विजय मिळवावा अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. फाफ डुप्लेसिस व केविन पीटरसन हे दुखापतग्रस्त असल्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत फलंदाजीची बाजू अजिंक्य रहाणे, स्टिव्हन स्मिथ व धोनी यांनी सांभाळली आहे. गोलंदाजांनी केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळेच गुजरातविरुद्ध स्मिथचे शतक व्यर्थ ठरले होते. डुप्लेसिसच्या जागी ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा या अनुभवी फलंदाजास संघात स्थान मिळाले आहे. अव्वल दर्जाचा गोलंदाज रविचंद्रन अश्विन याचे अपयश हीच पुण्यासाठी डोकेदुखी ठरली आहे. अल्बी मोर्कल, अशोक दिंडा, थिसारा परेरा यांना विकेट्स मिळत असल्या तरी त्याकरिता त्यांना खूप धावा मोजाव्या लागत आहेत ही चिंतेची गोष्ट आहे.
किंग्ज इलेव्हन पंजाब व कोलकाता नाईट रायडर्स यांच्याविरुद्धच्या विजयामुळे मुंबईच्या खेळाडूंचे मनोधैर्य उंचावले आहे. फलंदाजीत कर्णधार रोहित शर्मा, किरॉन पोलार्ड, क्रुणाल व हार्दिक पंडय़ा, पार्थिव पटेल यांच्यावर मुंबईची मदार आहे. गोलंदाजीत टीम साउथी, मिचेल मॅक्लनाघन यांच्याबरोबरच जसप्रीत बुमराह, हरभजनसिंग यांच्या कामगिरीबाबत उत्कंठा निर्माण झाली आहे.

सामन्याची वेळ : रात्री आठ पासून थेट प्रक्षेपण : सेट मॅक्स, सोनी सिक्स