भारतीय महिला हॉकी संघातून डच्चू मिळालेल्या रितू राणीने हॉकी इंडियाची निवड समिती व प्रशिक्षकांवर कडाडून टीका केली आहे. आपल्यावर खराब कामगिरीचा खोटा आरोप ठेवण्यात आला आहे, असे तिने सांगितले.

भारतीय संघाकडून अनेक वर्षे सातत्यपूर्ण आक्रमक खेळ करण्याबाबत रितू ओळखली जाते. भारताला ३६ वर्षांनंतर प्रथमच ऑलिम्पिक प्रवेश मिळाला. त्यामध्ये तिच्या कामगिरीचा महत्त्वाचा वाटा होता. तसेच तिने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये भारतास कौतुकास्पद यश मिळवून दिले होते. नियंत्रणबद्ध व नियोजनपूर्वक खेळ करण्यात ती वाकबगार खेळाडू मानली जाते. सहकारी खेळाडूंकडे चेंडू टोलवण्याबाबत ती अव्वल दर्जाची खेळाडू आहे.

‘‘संघातून वगळण्यात आल्याच्या वृत्ताने मला खूप मोठा धक्का बसला. मला कोणत्या कारणास्तव वगळण्यात आले आहे हे कोणीही स्पष्ट केलेले नाही. तंदुरुस्तीबाबत माझ्या कोणत्याही समस्या नाहीत. मी कोणतेही बेशिस्त वर्तन केलेले नाही. मी कधीही शिबीर अर्धवट सोडलेले नाही किंवा शिबिरातून दांडी मारलेली नाही,’’ असे रितूने सांगितले.

‘‘मैदानाबाहेर सरदार सिंगलाही वैयक्तिक जीवनात समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्याच्याकडून भारताचे कर्णधारपद काढून घेण्यात आले असले, तरी त्याला संघात स्थान देण्यात आले आहे. जर हाच निकष लावायचा झाल्यास मलाही संघात स्थान देणे आवश्यक आहे. आजपर्यंत मी देशासाठी जीव तोडून हॉकी खेळले, त्यावर निवड समितीने पाणी सोडले आहे. मी ऑलिम्पिकमधील हॉकीचे सामनेही पाहणार नाही एवढी तीव्र नाराजी मला वाटू लागली आहे,’’ रितू म्हणाली.