मुंबईच्या वानखेडे मैदानावर शनिवारी क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा भूतकाळाचा अनुभव घेता आला. Road Safety World Series स्पर्धेत सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली India Legends संघाने विंडीजवर ७ गडी राखून मात केली. या स्पर्धेत सर्व जुने खेळाडू सहभागी होत आहेत.

नाणेफेक जिंकत भारताचा कर्णधार सचिन तेंडुलकरने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विंडीजच्या संघाने सावध सुरुवात करत भारतीय गोलंदाजांचा नेटाने सामना केला. मात्र झहीर खानने आपल्या नेहमीच्या शैलीत डॅरेन गंगाचा त्रिफळा उडवत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. यानंतर कर्णधार ब्रायन लारा इरफान पठाणच्या गोलंदाजीवर समीर दिघेकरवी यष्टीचीत झाला. मात्र दुसऱ्या बाजूने शिवनारायण चंद्रपॉलने एक बाजू सांभाळून धरत विंडीज संघाला आश्वासक धावसंख्या उभारुन दिली. त्याने ४१ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह ६१ धावा केल्या. भारताकडून झहीर खान-मुनाफ पटेल आणि प्रज्ञान ओझा यांनी प्रत्येकी २-२ तर इरफान पठाणने एक बळी घेतला.

प्रत्युत्तरादाखल भारतीय संघाने धडाकेबाज सुरुवात केली. सचिन तेंडुलकर-विरेंद्र सेहवागने आपल्या जुन्या शैलीत वानखेडे मैदानावर विंडीज गोलंदाजांची धुलाई केली. पहिल्या विकेटसाठी ८३ धावांची भागीदारी केल्यानंतर भारताला पहिला धक्का बसला. सुलेमान बेनने सचिनला ३६ धावांवर बाद केलं. यानंतर मोहम्मद कैफ आणि मनप्रीत गोनी हे फलंदाज फारशी चमक दाखवू शकले नाहीत. मात्र दुसऱ्या बाजूने सेहवागने फटकेबाजी करत ५७ चेंडूत ११ चौकारांसह नाबाद ७४ धावा करत भारताचं पारडं जड ठेवलं. अखेरीस सेहवागने युवराज सिंहच्या साथीने दिलेलं आव्हान पूर्ण करत भारताने ७ गडी राखून सामन्यात बाजी मारली.