आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या वीरेंद्र सेहवागचा जलवा क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा पाहायला मिळाला. सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही सेहवागची बॅट तोफेसारखी धडाडली. इंडिया रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज टी २० स्पर्धेत दमदार अर्धशतक करत सेहवागने आपल्या संघाला विजय मिळवून दिला. त्यांच्या या खेळीचं सगळीकडे कौतूक होत असतानाच सेहवागने ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

इंडिया रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज टी 20 स्पर्धेत ५ मार्चला म्हणजेच शुक्रवारी बांगलादेश लिजेंड्स विरुद्ध इंडिया लिजेंड्स या संघामध्ये सामना खेळवण्यात आला. या सामन्यात इंडिया संघाने बांगलादेशवर १० गडी राखून दणदणीत विजय मिळवला. याच सामन्यात सेहवागने तडाखेबंद खेळी करत संघाला सहज विजय मिळवून दिला. सेहवागने एकूण ३५ चेंडूत ८० धावा चोपल्या. सेहवागने या नाबाद खेळीत १० चौकार आणि ५ षटकारांची आतिषबाजी केली. त्यांच्या या खेळीची चर्चा होत असतानाच सेहवागने ट्विट केलं आहे.

Video! सेहवाग स्पेशल : पहिल्याच चेंडूवर चौकार, उत्तूंग षटकारासह स्फोटक अर्धशतक; बांगलादेशचा धुव्वा

“परंपरा… प्रतिष्ठा… अनुशासन. खूप मज्जा आली. दुसऱ्या बाजूला सचिन पाजी असताना फटकेबाजी करताना एक वेगळीच मजा आली,” अशा आशयाचं ट्विट सेहवागने केलं आहे.

बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना ११० धावांचं आव्हान दिलं होतं. आव्हानाचं पाठलाग करण्यासाठी इंडियाकडून सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग ही अनुभवी जोडी मैदानात आली. सेहवागने आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत फटकेबाजी करायला सुरुवात केली. सेहवागने बांगलादेशच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. अवघ्या २० चेंडूत सेहवागने आपलं अर्धशतक पूर्ण केलं.