चार लाखांचा ऐवज लंपास

मुळशी तालुक्यातील भूगाव येथे रंगलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम सामान्यात चोरटय़ांनी रविवारी सायंकाळी धुमाकूळ घातला. कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी आलेल्या संगणक अभियंत्यासह चौघांच्या गळ्यातील सोनसाखळ्या आणि मोबाईल असा चार लाख ५८ हजारांचा ऐवज लांबविण्यात आला. याप्रकरणी पोलिसांकडून एका चोरटय़ाला पकडण्यात आले आहे.

अशोक पवार (वय २६ रा. पाथर्डी, जि. अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. यासंदर्भात एका संगणक अभियंता तरूणाने पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळशी तालुक्यातील भूगाव येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात अभिजित कटके आणि किरण भगत यांच्यात लढत झाली. ही स्पर्धा पाहण्यासाठी जवळपास पाऊण लाख प्रेक्षक आले होते. त्या वेळी तेथे मोठी गर्दी होती. गर्दीत पवार आणि त्याच्या साथीदारांनी संगणक अभियंता तरूणाच्या गळ्यातील पाच तोळे वजनाचा गोफ लांबविला. तसेच अन्य तिघांच्या गळ्यातील सोनसाखळ्या लांबविल्या. एका प्रेक्षकाचा मोबाईल चोरटय़ांनी लांबविला.

कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या अनेक प्रेक्षकांचे खिसे कापण्यात आले. संगणक अभियंता तरूणासह अन्य चौघांकडील ऐवज चोरटय़ांनी लांबविल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. कुस्ती स्पर्धेदरम्यान अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून तेथे मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस बंदोबस्त असताना स्पर्धेदरम्यान साखळीचोरी, खिसे कापणे तसेच मोबाईल चोरीच्या घटना घडल्या. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी अशोक पवारला संशयावरून ताब्यात घेतले. त्याने चोरी केल्याची कबुली दिली असली तरी ऐवज साथीदारांकडे दिल्याचे पोलिसांना सांगितले. पौड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर तपास करत आहेत.