फुटबॉल वर्ल्डकप पात्रता स्पर्धेतील इंग्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी पोलंडचा स्टार खेळाडू रॉबर्ट लेवांडोवस्कीला संघाबाहेर बसावे लागू शकते. कोरोना विषाणूमुळे होणारी बंदी लक्षात घेता बायर्न म्युनिक लेवांडोवस्कीला लंडनला जाऊ देणार नाही, असा अंदाज पोलंडचे प्रशिक्षक पाउलो सॉसा यांनी बांधला आहे.

नियमांनुसार, जो कोणी ब्रिटनहून जर्मनीला येईल त्याला क्वारंटाइनमध्ये राहावे लागेल. जर लेवांडोवस्की इंग्लंडला गेला, तर तो बायर्न म्युनिकसाठी उपलब्ध होणार नाही. जर असे झाले तर, बुंडेस्लिगामध्ये आरबी लिपजिगविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी लेवांडोवस्की संघाबाहेर बसू शकतो.

पोलंड असोसिएशन बायर्न आणि यूएफाच्या संपर्कात

या संदर्भात पोलंड फुटबॉल असोसिएशन बायर्न म्युनिक आणि यूएफा यांच्याशी चर्चेत आहे. “लेवांडोवस्की खेळेल का नाही, हे या क्षणी मला माहित नाही. पोलंड फुटबॉल असोसिएशन यूएफाच्या संपर्कात आहे,” असे सॉसा म्हणाले.

बायर्न चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीत

बायर्न म्युनिकने चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली आहे. म्युनिकने दुसऱ्या टप्प्यातील सामन्यात लाजिओला 2-1 असे हरवत विक्रमी 19व्यांदा स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली. संघाचा स्टार खेळाडू रॉबर्ट लेवांडोवस्कीने 33व्या मिनिटाला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली.

पहिल्या सत्रापर्यंत म्युनिकने ही आघाडी कायम राखली. त्यानंतर, दुसऱ्या सत्रात एरिक मॅक्मि चौपा मोटिंगने 73व्या मिनिटाला गोल करत ही आघाडी वाढवली. या गोलच्या नऊ मिनिटानंतर लाजिओने गोल करत लढत 2-1 अशी केली. लाजिओकडून मार्को पारोलोने 82व्या मिनिटाला गोल नोंदवत सामन्यात रंगत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, निर्धारित वेळेपर्यंत लाजिओला अधिक गोल करता आले नाहीत.

बायर्न म्युनिक आणि चेल्सीव्यतिरिक्त लिव्हरपूल, मँचेस्टर सिटी, बोरुशिया डॉर्टमंड, रियाल माद्रिद, पॅरिस सेंट जर्मन आणि पोर्तो या संघांनी क्वार्टर फायनलमध्ये जागा निश्चित केली आहे.