साव पावलो : कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेतील ‘एल क्लासिको’ लढत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अर्जेटिना विरुद्ध उरुग्वे यांच्यातील सामन्यात लिओनेल मेसीच्या अर्जेटिनाने सरशी साधली. शनिवारी पहाटे झालेल्या या लढतीत गुइडो रॉड्रिगेजच्या एकमेव गोलच्या बळावर अर्जेटिनाने १-० असा विजय मिळवून गटात अग्रस्थान मिळवले.

इस्टाडिओ नॅशनल दी ब्राझिलिया स्टेडियममध्ये झालेल्या ‘अ’ गटातील या सामन्यात रॉड्रिगेजने १३व्या मिनिटाला मेसीने डाव्या दिशेने दिलेल्या पासवर हेडरद्वारे गोल नोंदवला. चिलीविरुद्ध बरोबरी पत्करणाऱ्या अर्जेटिनाचे दोन सामन्यांत चार गुण झाले असून २२ जून रोजी त्यांची पॅराग्वेशी गाठ पडणार आहे.

दुसरीकडे उरुग्वेने पहिली लढत गमावल्यामुळे पुढील लढतीत चिलीविरुद्ध त्यांना कामगिरी उंचवावी लागेल. चिलीने शुक्रवारी झालेल्या सामन्यात बेन ब्रेरेटोनच्या गोलमुळे बोलिव्हियावर १-० अशी मात करून पहिल्या विजयाची नोंद केली.

मार्टिन्सवर कारवाई

’  कोपा अमेरिका फुटबॉल स्पध्रेच्या संयोजकांवर टीका केल्याप्रकरणी बोलिव्हियाचा आक्रमक मार्सेलो मार्टिन्सवर कारवाई करण्यात आली आहे. शिस्तपालन आयोगाने शुक्रवारी मार्टिन्सला एक सामन्याची बंदी आणि २० हजार डॉलरचा दंड सुनावला आहे. मार्टिन्सने पुन्हा ही चूक केल्यास एक वर्षांची बंदी घालण्यात येईल.

  • व्हेनेझुएला वि. इक्वाडोर

वेळ : मध्यरात्री २:३० वा

  • कोलंबिया वि. पेरू

वेळ : सकाळी ५:३० वा

थेट प्रक्षेपण : सोनी टेन १, सोनी टेन २ , सोनी सिक्स व एचडी वाहिन्या.