मुख्य प्रशिक्षक ओल्टमन्स यांचे मत

शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा परिपक्व झालेल्या भारतीय हॉकी संघाला पडताळण्याची संधी आगामी सुल्तान अझलन शाह चषक हॉकी स्पध्रेत मिळणार आहे, असे मत भारताचे मुख्य प्रशिक्षक रोलँट ओल्टमन्स यांनी व्यक्त केले.

युवा खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ नव्या रणनीतीसह या प्रतिष्ठेच्या स्पध्रेत खेळणार आहे. भारतीय संघाने शनिवारी रात्री इपोह (मलेशिया) येथे प्रयाण केले. याबाबत ओल्टमन्स म्हणाले, ‘‘कोणत्याही स्पध्रेची चांगली सुरुवात महत्त्वाची असते, परंतु शेवट हासुद्धा अधिक महत्त्वाचा असतो. अझलन शाह स्पर्धा म्हणजे भारतीय संघाची कसोटी ठरणार आहे. माझ्या भारतीय संघाकडून मोठय़ा अपेक्षा आहेत.’’

भारताचे ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन, न्यूझीलंड, जपान आणि यजमान मलेशियाशी सामने होणार आहेत. गतवर्षी भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. यंदा बलाढय़ ऑस्ट्रेलियाला नमवून ही कामगिरी सुधारण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे.

‘‘भारताच्या वाटचालीत ऑस्ट्रेलियासारख्या संघाला हरवणे, हे आव्हानात्मक ठरेल. गतवर्षीपर्यंत या संघात अनेक अनुभवी खेळाडूंचा भरणा होता. परंतु आताही सर्वात अनुभवी संघ ऑस्ट्रेलियाचा आहे. त्यामुळे कठीण परिस्थिती हाताळण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे,’’ असे ओल्टमन्स यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, ‘‘भारतीय संघात अनुभवी युवा खेळाडू आहेत. जे सामन्याला कोणत्याही क्षणी कलाटणी देऊ शकतात. या स्पध्रेत आम्ही ऑस्ट्रेलियाला हरवू शकलो, तर संघाचा आत्मविश्वास वाढेल.’’

या स्पध्रेच्या पाश्र्वभूमीवर भारताचे ४० दिवसांचे सराव सत्र झाले. भारताचा २९ एप्रिलला ग्रेट ब्रिटनशी सलामीचा सामना होणार आहे.