स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर आणि स्पेनचा राफेल नदाल हे टेनिस जगतातील आघाडीचे टेनिसपटू लवकरच आपल्याला एकत्र खेळताना दिसणार आहेत. पुढील वर्षी होणाऱया लेव्हर कप स्पर्धेत दुहेरी गटात फेडरर आणि नदाल एकत्र खेळणार आहेत.
फेडरर आणि नदाल हे टेनिस कोर्टवरचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे हे दोघे एकत्र खेळताना पाहणे टेनिस चाहत्यांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. ऑस्ट्रेलियाचे दिग्गज टेनिसस्टार रॉड लेव्हर यांच्या सन्मानार्थ या स्पर्धेचे ‘लेव्हर कप’ असे नामकरण करण्यात आले आहे. पुढील वर्षी २२ ते २४ सप्टेंबर या कालावधीत चेक प्रजासत्ताकची राजधानी प्राग येथे या स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे.
टेनिस विश्वात फेडरर आणि नदाल यांच्यात ग्रँडस्लॅम स्पर्धेत पुरूष एकेरी गटात कट्टर द्वंद्व पाहायाला मिळाले आहे. एकमेकांविरुद्धच्या या दोघांच्या अनेक लढती या ऐतिहासिक ठरल्या आहेत. लेव्हर कपमध्ये दोन संघ निश्चित करण्यात आले असून, बियाँग बोर्ग हे युरोपच्या संघाचे, तर जॉन मेकएन्रो हे शेष विश्व संघाचे नेतृत्त्व करणार आहेत. युरोपच्या संघात फेडरर आणि नदाल यांचा समावेश करण्यात आला आहे.