रॉजर फेडरर याने ऑस्ट्रोलियन ओपन स्पर्धेत क्रोएशियाच्या मारिन सिलिचला ६-२, ६-७, ६-३, ३-६, ६-१ अशा सेटमध्ये हरवले. रॉजर फेडररने सलग दुसऱ्यांदा आणि एकूण सहाव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपदावर आपले नाव कोरले. गेल्यावर्षीही फेडररने सिलिचला हरवूनच हे विजेतेपद जिंकले होते.

रॉजर फेडररचे टेनिस करिअरमधले २० वे ग्रँडस्लॅम विजेतेपद ठरले आहे. मेलबर्नमध्ये झालेल्या या लढतीत फेडररने पहिला, तिसरा आणि पाचवा सेट जिंकून आपले विजेतेपद निश्चित केले. पुरुष एकेरीत सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारा टेनिसपटू फेडरर ठरला आहे. रॉजर फेडररने सर्बियाच्या नोवोक जोकोविच आणि ऑस्ट्रेलियाच्या रॉय एमरनप्रमाणेच ६ वेळा विजेतेपद जिंकण्याचा रेकॉर्डही केला आहे. ग्रँड स्लॅम फायनल खेळण्याची फेडररची ही ३० वी वेळ होती.

स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर आणि क्रोएशियाचा सिलिच हे दोघेही आत्तापर्यंत दहावेळा प्रतिस्पर्धी म्हणून समोरासमोर आले आहेत. या १० पैकी ९ वेळा रॉजर फेडरर विजयी झाला आहे. तर एकदा सिलिच विजयी झाला आहे. सिलिचने २०१४ मध्ये अमेरिका ओपनमध्ये फेडररचा पराभव केला होता.

रॉजर फेडरर आणि दक्षिण कोरियाचा खेळाडू हेयॉन चुंग यांच्यात सेमी फायनल रंगली होती. हेयॉन चुंग सेमीफायनलमध्ये दमदार खेळी करु शकला नव्हता त्याचमुळे त्याला नमवून फेडररने अंतिम फेरीत धडक दिली होती. सेमी फायनल मध्ये चुंगच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला उपचारासाठी धाडण्यात आले. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये राफेल नदाल आणि स्टॉन वावरिंका हे खेळाडू दुखापतीमुळे भाग घेऊ शकले नाहीत. तसेच एंडी मरेने या स्पर्धेत सहभाग घेतला नव्हता.

सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकणारे ५ खेळाडू

रॉजर फेडर – २० ग्रँडस्लॅम
राफेद नदाल- १५ ग्रँडस्लॅम
पीट संप्रास- १४ ग्रँड स्लॅम
रॉय एमरसन -१२ ग्रँड स्लॅम
नोवोक जोकोविच- १२ ग्रँड स्लॅम