इंडियन वेल्स टेनिस स्पर्धा

रोमहर्षक अंतिम सामन्यात डॉमिनिक थीमचा ३-६, ६-३, ७-५ असा विजय

कारकीर्दीत आतापर्यंत पाच वेळा इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घालणाऱ्या मातब्बर टेनिसपटू रॉजर फेडररला सोमवारी पराभवाचा धक्का बसला. युवा डॉमिनिक थीमने फेडररला अंतिम फेरीत ३-६, ६-३, ७-५ असे पराभूत करत त्याचे विक्रमी सहाव्या जेतेपदाचे स्वप्न धूळीस मिळवले.

जागतिक टेनिस क्रमवारीत आठव्या स्थानी असणाऱ्या ऑस्ट्रियाच्या थीमला यापूर्वीच्या दोन्ही मास्टर्स स्पर्धाच्या अंतिम फेरीत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते; परंतु या वेळी त्याने कसर भरून काढली.

जवळपास दोन तास रंगलेल्या या सामन्यात थीमने नेटजवळ अप्रतिम खेळ केला. कारकीर्दीतील १२व्या विजेतेपदाला गवसणी घालणाऱ्या थीमने पहिला सेट गमावल्यानंतर झोकात पुनरागमन करत जागतिक टेनिस क्रमवारीत चौथ्या स्थानी असणाऱ्या फेडररवर सरशी साधली.

आतापर्यंतच्या कारकीर्दीत फेडररवर मिळवलेला थीमचा हा तिसरा विजय ठरला.

१९९७ नंतर प्रथमच ऑस्ट्रियन टेनिसपटूने मास्टर्स स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.

सलग दुसऱ्या वर्षी फेडररला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. २०१८मध्ये डेल पोत्रोने त्याला अंतिम लढतीत पराभूत केले होते.

दडपणाच्या परिस्थितीतही थीमने संयम बाळगला. त्यामुळेच चेंडूवर नियंत्रण मिळवणे त्याला अधिक सोपे गेले. असाच खेळ केल्यास भविष्यात तो आणखी विजेतेपदे सहज जिंकू शकतो.

– रॉजर फेडरर, स्वित्झर्लंडचा टेनिसपटू