टेनिसचा अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळख असलेल्या रॉजर फेडररने आपल्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. काही दिवसांपूर्वी दुबई एटीपी टेनिस स्पर्धेत रॉजर फेडररने स्टेफॅनो त्सित्सिपासला 6-4, 6-4 असं पराभूत करत आपल्या कारकिर्दीतलं शंभरावं विजेतेपद पटकावलं. एकतर्फी अंतिम सामन्यात फेडररने वर्चस्व गाजवले. त्याने त्सित्सिपासला सामन्यात एकदाही वरचढ न होउ देता त्याच्यावर पहिल्या सेट पासूनच दबाव वाढवला. ज्यामुळे हा सामना फेडररने केवळ 69 मिनिटांमध्येच आपल्या नावे करत 100 वं एटीपी विजेतेपद पटकावलं.

20 वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धेची विजेतेपदं जिंकणाऱ्या 37 वर्षीय फेडररने अमेरिकेच्या जिमी कॉनर्सनंतर 100 विजेतेपदं जिंकणारा टेनिसपटू म्हणून फेडररने टेनिसच्या इतिहासात आपला ठसा उमटविला आहे. कॉनर्सच्या खात्यात 109 विजेतेपदं आहेत. त्सित्सिपासविरुद्धच ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये फेडररला चौथ्या फेरीत पराभव स्वीकारावा लागला होता.