सिनसिनाटी : रॉजर फेडररने पीटर गोजोझिकचा ६-४, ६-४ असा सरळ सेटमध्ये पराभव करून एटीपी सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धेत शानदार सलामी नोंदवली आहे. २०१५नंतर प्रथमच या स्पर्धेत उतरणाऱ्या फेडररने आगामी अमेरिकन खुल्या स्पर्धेसाठी आपण सज्ज असल्याचा इशाराच जणू दिला आहे.

फेडररने जागतिक क्रमवारीत ४७व्या स्थानावर असलेल्या जर्मनीच्या गोजोझिकचा ७२ मिनिटांत पराभव केला. गेल्या आठवडय़ात वयाची ३७ वर्षे पूर्ण करणाऱ्या फेडररच्या खात्यावर २० ग्रँडस्लॅम विजेतेपदे आहेत. मात्र आता तो महत्त्वाच्या स्पर्धामध्येच सहभागी होतो. दुखापतींमुळे मागील दोन वर्षे तो सिनसिनाटी स्पर्धेतही सहभागी होऊ शकला नव्हता.

क्रोएशियाच्या बोर्ना कोरिचने डॅनिल मेदव्हेदेवचा ६-२, ६-३ असा पराभव केला. दक्षिण कोरियाच्या च्यूंग ोऑनने जॅक सॉकला २-६, ६-१, ६-२ असे नामोहरम केले.

महिलांच्या दुसऱ्या फेरीत आठव्या मानांकित पेत्रा क्विटोव्हाने सेरेना विल्यम्सचे आव्हान ६-३, २-६, ६-३ असे मोडीत काढले. ऑस्ट्रेलियाच्या १६व्या मानांकित अ‍ॅश्लेघ बार्टीने चेक प्रजासत्ताकच्या मार्केटा व्होंड्रोसोव्हाचा ६-३, ७-५ असा पराभव केला.