नदाल, चिलिच, कर्बर, वोझ्निायाकी यांचीही आगेकूच; अँडरसनचे आव्हान संपुष्टात

मेलबर्न : जगभरातील सवरेत्कृष्ट टेनिसपटूंपैकी एक म्हणून प्रसिद्ध असलेल्या रॉजर फेडररला बुधवारी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीतील लढतीत विजयासाठी अक्षरश: घाम गाळावा लागला. फेडररव्यतिरिक्त राफेल नदाल, मरिन चिलिच, अँजेलिक कर्बर, कॅरोलिन वोझ्नियाकी यांनीदेखील तिसरी फेरी गाठली. मात्र केव्हिन अँडरसनला स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला.

कारकीर्दीतील २०व्या ग्रँडस्लॅमच्या दिशेने कार्यरत असणाऱ्या स्वित्र्झलडच्या तिसऱ्या मानांकित फेडररने इंग्लंडच्या डॅन इव्हान्सला ७-६ (७-५), ७-६ (७-३), ६-३ असे पराभूत केले. २ तास ३५ मिनिटे रंगलेल्या पुरुष एकेरीतील या लढतीत फेडररने फोरहॅण्डच्या फटक्यांचा सुरेख वापर केला. सलग दोन वेळा या स्पर्धेचे विजेतेपद मिळवणाऱ्या फेडररला इव्हान्सने कडवी झुंज दिली. त्याने पहिल्या दोन्ही सेटमध्ये टायब्रेकपर्यंत सामना नेला. मात्र तिसऱ्या सेटमध्ये फेडररने अनुभवाच्या जोरावर बाजी मारली.

दक्षिण आफ्रिकेच्या पाचव्या मानांकित अँडरसनला अमेरिकेच्या फ्रान्सेस टिआफोकडून ४-६, ६-४, ६-४, ७-५ असा पराभव पत्करावा लागला. ही लढत तब्बल तीन तास रंगली. फ्रान्ससनेच भारताच्या प्रज्ञेश गुणेश्वरनला पहिल्या फेरीत पराभूत केले होते. स्पेनच्या दुसऱ्या मानांकित नदालने मात्र ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एब्डनला ६-३, ६-२, ६-२ अशी सहज धूळ चारत आरामात तिसरी फेरी गाठली. तर क्रोएशियाच्या सहाव्या मानांकित चिलिचने मॅकेन्झी मॅकडॉनल्डवर ७-५, ६-७ (९-११), ६-४, ६-४ असा रोमहर्षक विजय मिळवला.

महिला एकेरीत जर्मनीच्या द्वितीय मानांकित कर्बरने बिट्झ माईआवर ६-२, ६-३ अशी सहज मात केली. तर गतविजेत्या वोझ्निायाकीने जोहना लार्सनचा ६-१, ६-३ असा धुव्वा उडवला. तसेच अमेरिकेच्या पाचव्या मानांकित स्लोन स्टीफन्सनेही पुढील फेरीत आगेकूच केली. तिने टिमेआ बाबोसला ६-१, ६-३ असे नामोहरम केले.

बोपण्णा-दिविज यांच्या पराभवामुळे भारताचेही आव्हान संपुष्टात

मेलबर्न : प्रज्ञेश गुणेश्वरनला सोमवारी पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागल्यानंतर बुधवारी पुरुष दुहेरीत भारताच्या रोहन बोपण्णा व दिविज शरण यांच्यासह लिएण्डर पेसचाही पराभव झाल्यामुळे भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

स्पेनच्या बिगरमानांकित पाबलो बुस्ता व गुलीर्मो लोपेझ यांनी भारताच्या १५व्या मानांकित बोपण्णा-शरण यांच्या जोडीला १-६, ६-४, ५-७ अशी धूळ चारली. कारकीर्दीत २४व्यांदा ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेत खेळणाऱ्या पेस व त्याचा सहकारी मिगुएल व्हॅरेला यांना अमेरिकेच्या ऑस्टिन क्रजिसेक व अर्टेम सितक यांनी ५-७, ६-७ असे सरळ दोन सेटमध्ये नमवले. तर जीवन नेदूछेझियान व निकोलस मोनरो यांना केव्हिन क्रॅव्हिट्झ व निकोल मेटिक यांच्याकडून ६-४, ६-७, ५-७ असा पराभव स्वीकारावा लागला.

मी सामन्याच्या सुरुवातीपासूनच अव्वल खेळ केला असता तर कदाचित मला इतके परिश्रम घ्यावे लागले नसते, मात्र इव्हान्सने अप्रतिम खेळ केला. त्यामुळे त्याचे कौतुक केलेच पाहिजे. या सामन्यामुळे पुढील फेरीसाठी कोणत्या कमकुवत बाजूंवर लक्षकेंद्रीत करायचे आहे, हे उमगले.

– रॉजर फेडरर, स्वित्र्झलडचा टेनिसपटू