सिनसिनाटी खुल्या टेनिस स्पर्धेत स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर याला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. जागतिक क्रमवारीत ७० व्या स्थानी असलेल्या अँड्रे रूब्लेव्ह याने फेडररचा स्पर्धेच्या ‘राऊंड ऑफ १६’ च्या फेरीत पराभव केला. चाहत्यांना फेडररकडून दमदार खेळाची अपेक्षा होती. पण फेडरर सामन्यात पूर्णपणे अपयशी ठरला. रूब्लेव्हने त्याला ६-३, ६-४ अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले आणि स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

महत्वाची बाब म्हणजे रॉजर फेडरर आणि अँड्रे रूब्लेव्ह हे दोघे पहिल्यांदाच टेनिस कोर्टवर एकमेकांसमोर उभे ठाकले होते. फेडरर विरूद्धच्या आपल्या कारकिर्दीतील पहिल्यावहिल्या सामन्यातच रूब्लेव्हने फेडररला पराभवाची चव चाखायला भाग पाडले.

फेडररने सिनसिनाटी खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद ७ वेळा जिंकले आहे. पण यंदाच्या स्पर्धेत त्याला आपली छाप उमटवता आली नाही. प्रतिष्ठेच्या विम्बल्डन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर हा त्याचा केवळ दुसराच सामना होता. या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात त्याने अर्जेंटिनाच्या लोंडेरोला ६-३, ६-४ अशी धूळ चारली होती. त्यामुळे फेडररकडून अपेक्षा उंचावल्या होत्या, पण त्याला अपेक्षांचे ओझे पेलता आले नाही.