पुणे : टाटा महाराष्ट्र खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या रोहन बोपण्णा व दिविज शरण जोडीला अंतिम सामन्यात ग्रेट ब्रिटनच्या लूक बांब्रिज व जॉनी ओमारा या जोडीशी झुंजावे लागणार आहे.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या दुहेरीत उपांत्य फेरीच्या चुरशीच्या लढतीत भारताच्या अव्वल मानांकित रोहन बोपण्णा व दिविज शरण या जोडीने इटलीच्या सिमॉन बोलेल्ली व क्रोएशियाच्या इवान दोडीज यांचा सुपरटायब्रेकमध्ये ६-३, ३-६, ७-६ असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. दुसऱ्या उपांत्य सामन्यात ग्रेट ब्रिटनच्या लूक बांब्रिज व जॉनी ओमारा या जोडीने स्पेनच्या गेरार्ड ग्रनॉलर्स व मार्सेल ग्रनॉलर्स या जोडीचा ६-४, ३-६, ७-६ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.

टेनिस संघटनेकडून सोमदेवला आव्हान

पुणे : भारतीय टेनिसच्या विकासासाठी सोमदेव देववर्मनकडे जर अधिक चांगल्या योजना असतील तर त्याला त्याची अंमलबजावणी करण्यापासून कुणी रोखले आहे, अशी टीका अखिल भारतीय टेनिस संघटनेने केली आहे. सोमदेव हा पूर्वग्रहदूषित असल्याचा ठपका ठेवत संघटनेकडून त्याच्या मनानुसार अधिक दर्जेदार संघटन चालवण्यासाठी आव्हान देण्यात आले आहे. टेनिसच्या भवितव्यासाठी संघटनेकडे काय नियोजन आहे, असा सवाल सोमदेवने काही दिवसांपूर्वी केल्याच्या पाश्र्वभूमीवर हे आव्हान देण्यात आले आहे.

अंतिम सामना

दुपारी ३ वाजता  ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट २