पहिल्या कसोटीत ३१ धावांनी विजय मिळवून ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा श्रीगणेशा विजयाने करणाऱ्या भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत मुंबईकर रोहित शर्मा आणि आर. अश्विनला वगळले आहे. बीसीसीआयने १३ जणांचा संघ आज जाहिर केला आहे. यामध्ये विजयी संघातील रोहित आणि अश्विनचा समावेश नाही. रविंद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव या तिघांचा समावेश करण्यात आला आहे. प्रसार माध्यमांच्या वृत्तानुसार, अश्विन आणि रोहित शर्माला दुखापत झाल्यामुळे विश्रांती देण्यात आली आहे. मात्र, चाहत्यांना ही बाब रूचलेली दिसत नाही. सोशल मीडियावर याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

पहिल्या कसोटीमध्ये रोहित शर्माला आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नव्हती. चांगल्या सुरूवातीनंतर मोठ्या खेळीत धावसंख्या रूपांतर करण्यात रोहित शर्माला अपयश आले होते. तर अश्विनला अखेरच्या दिवशी विकेट घेताना संघर्ष करावा लागला होता. शेवटच्या दिवशी अश्विनची फिरकीची जादू चालली नव्हती.  पर्थ कसोटीमध्ये भारताचा संघ चार वेगवान गोलंदाजासह उतरण्याची शक्यता आहे. बुमराह, इशांत, उमेश आणि भुवनेश्वरसह एक फिरकी गोलंदाज असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता अंतिम ११ मध्ये कोणाची वर्णा लागते हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

पहिल्या कसोटीत पुजाराच्या दमदार फलंदाजी आमि बुमराहच्या गोलंदाजीच्या बळावर भारतीय संघाने विजय मिळवला आहे. चार कसोटी सामन्याच्या मालिकेत भारतीय संघ १-० ने आघाडीवर आहे.

असा आहे भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव</p>