मायदेशात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाला यश मिळवायचे असल्यास रोहित शर्मा आणि शिखर धवन या अनुभवी जोडीलाच सलामीसाठी प्राधान्य द्यावे, असे स्पष्ट मत राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष शरणदीप सिंग यांनी व्यक्त केले.

ऑक्टोबरमध्ये भारतात ट्वेन्टी-२० विश्वचषक रंगणार असून विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघात सध्या अनेक प्रतिभावान खेळाडूंचा भरणा आहे. त्यामुळे रोहित-धवन यांना के. एल. राहुल, इशान किशनसह आणखी काही खेळाडूंकडून सलामीच्या स्थानासाठी कडवी झुंज मिळत आहे. इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेतील पाच सामन्यांत भारताने चार जोड्यांची चाचपणी केली. त्यापैकी पाचव्या लढतीत रोहित-विराट कोहली यांनी दमदार कामगिरी केली. परंतु शरणदीप यांनी मात्र रोहित-धवन जोडीची पाठराखण केली आहे.

‘‘जवळपास गेल्या सात ते आठ वर्षांपासून मर्यादित षटकांच्या प्रकारांत रोहित-धवन यांच्या सलामी जोडीने भारताला अनेक लढती जिंकून दिल्या आहेत. रोहितला बहुतांश वेळा दुखापतीमुळे माघार घ्यावी लागते अथवा त्याला विश्रांती देण्यात येते. परंतु धवनला मात्र ट्वेन्टी-२० मालिकेतील फक्त एका लढतीनंतरच संघाबाहेर केल्याने मी आश्चर्यचकीत झालो,’’ असे शरणदीप म्हणाले.

‘‘रोहितकडे ज्या कल्पकतेने अथवा सहजतेने फलंदाजी करतो, तसे धवनला नक्कीच जमत नसेल. परंतु तो मानसिकदृष्ट्या अधिक कणखर आहे. विशेषत: ‘आयसीसी’च्या स्पर्धांमधील त्याची कामगिरी कौतुकास्पद आहे. संघ व्यवस्थापनाला प्रयोग करण्याच्या हेतूने युवा खेळाडूंना संधी द्यावी लागत असली, तरी विश्वचषकामध्ये तुमची सर्वोत्तम जोडीच सलामीला उतरणे गरजेचे आहे. म्हणून रोहित-धवननेच सलामीला यावे. ते दोघेही एकत्रित फलंदाजी करताना खेळण्याचा अधिक आनंद लुटतात आणि त्यामुळे आपोआपच भारतालाही लाभ होतो,’’ असेही शरणदीप यांनी सांगितले.

याशिवाय भारताने कुलदीप यादव आणि यजुर्वेंद्र चहल या फिरकी जोडीला पुन्हा एकदा एकत्रितपणे खेळवण्यास सुरुवात केली पाहिजे, असेही शरणदीप यांनी नमूद केले.