धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माच्या तंदुरुस्तीविषयी कोणतीही कल्पना नसल्याची नाराजी कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केल्यानंतर अखेर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्याच्या तंदुरुस्तीबाबतचे स्पष्टीकरण दिले. वडिलांच्या आजारपणामुळे तो ऑस्ट्रेलियाला रवाना होत नसून त्याची तंदुरुस्ती चाचणी ११ डिसेंबरला होणार असल्याचे सांगत ‘बीसीसीआय’ने रोहितच्या तंदुरुस्तीबाबतच्या चर्चेला पूर्णविराम दिला.

‘‘वडील आजारी असल्याने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) आटोपल्यावर रोहित थेट मुंबईत परतला. आता त्याचे वडील आजारपणातून सावरत आहेत. त्यानंतर तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सामील होऊन आपल्या पुनर्वसन कार्यक्रमाला सुरुवात करेल,’’ असे ‘बीसीसीआय’चे सचिव जय शाह यांनी सांगितले.

यजमान ऑस्ट्रेलियाच्या १४ दिवसांच्या विलगीकरणाच्या नियमामुळे रोहित पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकणार आहे. कोहलीने रोहितच्या तंदुरुस्तीविषयी कोणतीही माहिती नसल्याची नाराजी व्यक्त केली होती.

इशांतची कसोटी मालिकेतून माघार

भारताचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे. कसोटी सामन्यांना सुरुवात होण्यापूर्वी इशांत पूर्णपणे तंदुरुस्त होणार नसल्याने त्याने माघारीचा निर्णय घेतला. इशांतला अमिरातीत झालेल्या इंडियन प्रीमियर लीगदरम्यान ही दुखापत झाली होती.

सैनीऐवजी नटराजनचा समावेश

वेगवान गोलंदाज नवदीप सैनी पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे त्याच्या जागी मध्यमगती गोलंदाज टी. नटराजन याचा भारताच्या एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे. ‘‘सैनीने पाठीच्या दुखापतीची तक्रार केली आहे. त्यामुळेच तमिळनाडूच्या नटराजनला एकदिवसीय संघात स्थान देण्यात आले आहे,’’ असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या पत्रकात म्हटले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सरावासाठीचा गोलंदाज म्हणून समावेश करण्यात आलेल्या नटराजनला वरुण चक्रवर्तीने माघार घेतल्यामुळे ट्वेन्टी-२० संघातही स्थान मिळाले आहे.