नवीन चेंडूला सामोरे जाण्याचे कसोटी मालिकेत आव्हान  – रोहित शर्मा</strong>

उसळत्या, धोकादायक वेगवान चेंडूंना साथ देणाऱ्या खेळपट्टय़ा हे न्यूझीलंडमध्ये फलंदाजी करतानाचे पहिले आव्हान असेल, अशा शब्दांत भारताचा कसोटी सलामीवीर रोहित शर्माने न्यूझीलंड दौऱ्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. नील वॅग्नर, मॅट हेन्री, ट्रेंट बोल्ट आणि टिम साऊदी या न्यूझीलंडच्या वेगवान चौकडीला सामोरे जाण्यासाठी सज्ज असल्याचे रोहितने सांगितले.

भारताचा या महिन्याअखेरीस न्यूझीलंड दौरा सुरू होत असून ट्वेन्टी-२० व एकदिवसीय लढतींनंतर २१ फेब्रुवारीपासून दोन कसोटी सामने होणार आहेत. ‘‘न्यूझीलंडमध्ये क्रिकेट खेळणे सोपे नाही. गेल्या वेळेस न्यूझीलंडमध्ये कसोटी मालिका आम्ही ०-१ ने गमावली होती. मात्र तरी त्या वेळेस चांगली चुरस आम्ही दिली होती. मात्र यंदा गोलंदाजी हीदेखील आमची ताकद आहे. आम्हाला न्यूझीलंडच्या गोलंदाजांचे आव्हान आहे तसेच भारताच्या बहरात असणाऱ्या गोलंदाजांचेही न्यूझीलंडला आव्हान असेल,’’ याकडे रोहितने लक्ष वेधले.

‘‘परदेशातील खेळपट्टय़ांवर नवीन चेंडूला सामोरे जाणे सोपे नसते. नुकतीच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आम्ही घरच्या मैदानावर कसोटी मालिका खेळलो. मात्र त्या वेळेस चेंडू फारसा स्विंग होत नसल्याचे मला जाणवले. पुण्यातील दुसऱ्या कसोटीच्या वेळेस चेंडू थोडाफार स्विंग झाला. मात्र परदेशात चेंडू नवीन असताना सर्वाधिक स्विंग होतो. हे आमच्यासमोर आव्हान असेल. त्यातच मी २०१४ नंतर न्यूझीलंडमध्ये कसोटी मालिका खेळणार आहे. मात्र तरीदेखील आव्हान स्वीकारण्यासाठी तयार आहे. न्यूझीलंडला ऑस्ट्रेलियात ०-३ कसोटी मालिका पराभव स्वीकारावा लागला असला तरी मायदेशात ते सरस खेळतात,’’ असे रोहितने म्हटले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मायदेशात झालेल्या कसोटी मालिकेत रोहितला सलामीवीर म्हणून संधी देण्यात आली. त्या संधीचे सोने करत त्याने एका द्विशतकासह तीन शतके झळकवली.

मुंबई रणजी संघाला रोहितचे मार्गदर्शन

घरच्या मैदानावर सलग दोन लढती गमावणाऱ्या मुंबईच्या रणजी संघाला रोहित शर्माने मार्गदर्शन केले. सध्याच्या स्थितीवर कशी मात करावी, याचे मार्गदर्शन रोहितने त्याच्या मुंबईच्या संघसहकाऱ्यांना दिल्याची माहिती मिळते. रोहितला श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. त्याने मुंबई विरुद्ध कर्नाटक यांच्यातील रणजी लढतीत दुसऱ्या दिवसाच्या खेळाला उपस्थिती लावली होती.