CoronaVirus Outbreak : करोनाच्या तडाख्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे काही प्रमाणात लोक करोनातून बरे होत आहेत. पण असे असले तरी सध्या देशात करोनाग्रस्तांची संख्या प्रचंड वाढत आहे. राज्यात देखील करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.

जेव्हा कपिल देव-दाऊद ड्रेसिंग रूममध्ये आमने-सामने येतात…

करोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. अशा परिस्थितीत करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व क्रिकेटपटू चाहत्यांना घरी बसण्याचे आवाहन करत आहेत. घरबसल्या काही क्रिकेटपटू पूर्णपणे आपल्या कुटुंबाला वेळ देत आहेत, तर काही क्रिकेटपटू सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहेत. सध्या टिकटॉक आणि इतर प्रकारचे व्हिडीओ तयार करून स्वत:चे आणि चाहत्यांचे मनोरंजन करणारे क्रिकेटपटू लक्ष वेधून घेत आहेत. या दरम्यान भारताचा सलामीवीर रोहित शर्मा याने एक सकारात्मक बाब चाहत्यांच्या लक्षात आणून दिली आहे.

“…त्यानंतर विराट परत माझ्या नादी लागला नाही”

रोहितने करोनाशी लढा देणाऱ्या प्रत्येक देशवासीयासाठी एक छानसा संदेश दिला आहे. रोहितने ट्विटच्या माध्यमातून सकारात्मक गोष्टीकडे साऱ्यांचे लक्ष वेधले आहे. “हा विषाणू आपल्या साऱ्यांच्या जीवनात एका वादळासारखा आला आहे. ज्या गोष्टींना आपण सामान्य म्हणू शकतो, अशा साऱ्या गोष्टी या विषाणूने उद्ध्वस्त केल्या आहेत. पण जर या साऱ्याकडे आपण सकारात्मक दृष्टीने पाहिले, तर (लॉकडाउन काळात सारं काही बंद असल्याने) धरणीमाता सध्या स्वत:चे स्वास्थ्य सुधारते आहे. या अवघड आणि कसोटीच्या काळात धरणीमाता आपल्या साऱ्यांनादेखील आशेचा किरण शोधण्यास प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे आपण देखील सकारात्मक विचार करूया”, असा संदेश रोहितने दिला आहे.

धोनी नव्हे, ‘हा’ खेळाडू पुन्हा टीम इंडियात हवा; रोहितने व्यक्त केली इच्छा

अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा यानेही भारतवासीयांना एक संदेश देणारा व्हिडीओ पोस्ट केला आहे. जाडेजा त्या व्हिडीओमध्ये बॅट हातात घेऊन आपल्या घरातील लॉनवर खेळताना दिसतो. समोरून आलेला चेंडू टोलवल्यानंतर तो तलवारबाजीसारखी आपली बॅट फिरवतो आणि मग ‘करोनावर मात करण्यासाठी मी घरात थांबलो आहे, तुम्ही?’ असे तो विचारतो. या व्हिडीओतदेखील करोनावर मात करण्याचा मंत्र दिला आहे.