News Flash

भारतीय खेळाडूंकडून ‘कौटुंबिक कलमां’चे उल्लंघन

वरिष्ठ खेळाडूंवर कारवाईचा बडगा उगारण्यात येण्याची शक्यता

विश्वचषक स्पर्धेदरम्यान परवानगीपेक्षाही अधिक काळ पत्नीला सोबत ठेवत भारतीय खेळाडूंनी भारतीय क्रिकेट नियामक (बीसीसीआय) मंडळाच्या कुटुंबविषयक कलमाचे उल्लंघन केल्यामुळे काही वरिष्ठ खेळाडूंवर कारवाईचा बडगा उगारण्यात येण्याची शक्यता आहे.

खेळाडूंना आपल्या पत्नीला १५ दिवस सोबत ठेवण्याची परवानगी होती. त्यामुळे या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने खेळाडूंना धारेवर धरले आहे. यासाठी खेळाडूंनी कर्णधार किंवा प्रशिक्षकाकडून कोणतीही परवानगी घेतली नसतानाही संपूर्ण स्पर्धेदरम्यान जवळपास सात आठवडे खेळाडूंसोबत त्यांच्या पत्नी राहत होत्या.

संघातील एका खेळाडूने संपूर्ण स्पर्धेदरम्यान आपल्याला पत्नीची सोबत असावी, अशी मागणी मे महिन्यात बीसीसीआयकडे केली होती. मात्र त्याची ही मागणी बीसीसीआयने फेटाळून लावली होती. त्याच खेळाडूने या नियमाचे उल्लंघन केले आहे. त्याने कर्णधार किंवा प्रशिक्षकाकडून कोणतीही परवानगी घेतली नव्हती, असे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने सांगितले. मात्र या खेळाडूचे नाव स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र तो खेळाडू रोहित असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आता हे प्रकरण प्रशासकीय समितीकडे गेले असून प्रशासकीय व्यवस्थापक सुनील सुब्रह्मण्यम यांनी याकडे आक्षेप का घेतला नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. ‘‘सुनील सुब्रह्मण्यम काय करीत होता? त्याची जबाबदारी फक्त संघाच्या सराव शिबिरावर लक्ष ठेवण्याची नव्हती. प्रशासकीय समिती आता सुब्रह्मण्यम यांच्याकडून अहवाल मागेल, अशी अपेक्षा आहे,’’ असेही या पदाधिकाऱ्याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2019 1:29 am

Web Title: rohit sharma bcci icc cricket world cup 2019 mpg 94
Next Stories
1 हिमा दासला पाचवे सुवर्णपदक!
2 धोनीची वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार!
3 दुखापतीमुळे मोर्तझा मुकणार!
Just Now!
X