भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेचे मत

मुंबई : रोहित शर्मासारख्या कौशल्यवान फलंदाजाला भारताच्या कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी झगडावे लागते, हे दुर्दैवी आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्यालाच सलामीवीर म्हणून संधी देण्यात यावी, असे स्पष्ट मत भारताचा कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणेने गुरुवारी व्यक्त केले.

इंडियन ऑइलतर्फे मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका खास कार्यक्रमासाठी रहाणेव्यतिरिक्त महिला बुद्धिबळपटू हरिका द्रोणावल्ली आणि बिलियर्ड्सपटू ध्वज हरिया हेसुद्धा उपस्थित होते. या वेळी रहाणेने आफ्रिकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी संघाच्या योजनेविषयीही मत व्यक्त केले. ‘‘कसोटी क्रिकेटने गेल्या काही महिन्यांत पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकली आहेत. आफ्रिकेविरुद्धसुद्धा आम्ही कसोटी क्रिकेटला अधिक उंचीवर नेण्यासाठी निश्चित प्रयत्न करू. जसप्रीत बुमराने दुखापतीमुळे मालिकेतून माघार घेतल्याने संघाच्या व्यूहरचनेला नक्कीच धक्का बसला आहे. परंतु सध्याच्या भारतीय संघात वेगवान गोलंदाजांसह फिरकीपटूंचीही सक्षम फळी आहे. त्यामुळे अधिक चिंता करण्याचे कारण नाही,’’ असे रहाणे म्हणाला. कसोटी क्रिकेट माझे सर्वाधिक आवडते असले तरी एकदिवसीय संघातही पुनरागमन करण्याचे माझे ध्येय आहे, असे ३१ वर्षीय रहाणेने सांगितले.

रोहित शर्माला वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात स्थान देऊनही अंतिम ११ खेळाडूंमध्ये एकदाही सहभागी करण्यात आले नव्हते. याविषयी विचारले असता रहाणे म्हणाला, ‘‘रोहितसारखा फलंदाज संघाबाहेर असणे, हे फारच दुर्दैवी आहे. त्याच्याकडे एकहाती सामना जिंकवून देण्याची क्षमता आहे. आफ्रिकेविरुद्धही त्याचा कसोटी चमूत समावेश करण्यात आला आहे. परंतु त्याला अंतिम संघात कोणती भूमिका सोपवण्यात येईल, हे सांगणे कठीण आहे. मात्र रोहितलाच सलामीला संधी मिळावी, अशी माझीही इच्छा आहे.’’

रोहित आणि तुझ्यात कसोटी संघातील स्थानासाठी स्पर्धा आहे का, असे विचारले असता मात्र रहाणेने नकार दिला. ‘‘आम्ही दोघेही मुंबईतील स्थानिक क्रिकेटपासून एकत्र खेळत असून आमच्या दोघांच्याही खेळण्याची शैली भिन्न आहे. गेल्या एक-दोन वर्षांत माझी कामगिरी ढासळल्यामुळे अनेकांच्या मनात असा प्रश्न निर्माण झाला असावा, परंतु मी किंबहुना रोहितही यांसारख्या गोष्टींकडे लक्ष न देता स्वत:च्या खेळावरच लक्ष केंद्रित करण्याला प्राधान्य देतो,’’ असे ५७ कसोटींचा अनुभव गाठीशी असणाऱ्या रहाणेने सांगितले.

प्रवीण अमरे यांचे मार्गदर्शन मोलाचे!

गेल्या दोन वर्षांत मला एकही शतक झळकावता आले नव्हते. या काळात प्रवीण अमरे यांनी सातत्याने मला मोलाचे मार्गदर्शन केल्यामुळे मी वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत छाप पाडू शकलो, असे अजिंक्य रहाणेने सांगितले. ‘‘जेव्हा मी विंडीजविरुद्ध शतक झळकावले, तेव्हापासून मला जवळपास प्रत्येक ठिकाणी त्यानंतरच्या भावनांविषयी विचारण्यात येते. परंतु खरे सांगायचे तर मी या दरम्यानच्या काळातही शतकाचा कधी फारसा विचार केला नाही. निश्चितच अनेक जण जेव्हा शतक कधी झळकावणार, असा प्रश्न विचारायचे तेव्हा त्यांना उत्तर देताना निराशही व्हायचो. परंतु अमरे यांनी गेली १०-१२ वर्षे मला नेहमीच मोलाचे मार्गदर्शन केले असून, माझ्या क्षमतेची वेळोवेळी जाणीवही करून दिली आहे,’’ असे रहाणे म्हणाला. त्याशिवाय नवे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदाच खेळण्यासाठी उत्सुक असल्याचेही रहाणेने सांगितले.