फटाक्यांनी भरलेलं फळ खायला दिल्यामुळे केरळमधील मल्लपूरम जिल्ह्यात एका गर्भवती हत्तीणीला आपले प्राण गमवावे लागले. २७ मे रोजी घडलेली ही घटना केरळमधील वन-विभागाच्या अधिकाऱ्याच्या फेसबूक पोस्टमुळे प्रसारमाध्यमांमध्ये आली. प्रसारमाध्यमांमध्ये ही बातमी आल्यानंतर सर्व स्तरातून या घटनेचा निषेध केला जात आहे. राजकीय स्तरावरही याची दखल घेण्यात आली असून मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. पोलिसांनी या प्रकरणात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

भारताचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्मा याने एक हृदय पिळवटून टाकणारा फोटो शेअर केला आणि आपल्या भावना व्यक्त केल्या. “मनुष्य इतका क्रूर असू शकतो असं मला कधीच वाटलं नव्हतं. मानवता लोप पावत चालली आहे. एका निष्पाप, निरूपद्रवी आणि गोंडस अशा वन्य जीवाला इतक्या वाईट पद्धतीने कसं काय मारलं जातंय? अशा विकृत मनोवृत्तीच्या माणसांना शक्य तितकं कडक शासन करण्यात यायला हवं. आपण या जगाच्या विकासात हातभार लावायला हवाच, पण त्याचसोबत आपण प्रत्येक कृती करताना आपली सामाजिक जबाबदारीही लक्षात घ्यायला हवी”, असे रोहितने लिहिले.

घडलेल्या प्रकाराबद्दल भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यानेही शोक व्यक्त केला आहे. विराटने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर या घटनेचा निषेध व्यक्त केला असून प्राण्यांनाही प्रेमाची वागणूक मिळायला द्या, असं आवाहन केलं आहे. तसेच, भारतीय कुस्तीपटू गीता फोगाट हिने या प्रकरणी तीव्र शब्दात राग व्यक्त केला. ही घटना पाहून असं वाटतंय की मानव जातीच्या पापांचा घडा भरतो आहे. संपूर्ण माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे, असे रोखठोक मत तिने या प्रकरणी ट्विट केले.

अनेक सेलिब्रिटींनी या प्रकाराबद्दल चीड व्यक्त केली असून दोषींना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी सोशल मीडियावर होत आहे. हत्तीणीच्या मृत्यूसाठी जे जबाबदार असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी प्रसारमाध्यमांनी बोलताना दिली आहे. तसेच, वन-विभागानेही मारेकऱ्यांचा शोध सुरु केला असून दोषी व्यक्तींना लवकरात लवकर अटक केली जाईल अशी माहिती देण्यात आली आहे.