News Flash

रोहित शर्मा ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक षटकार ठोकणारा खेळाडू

मॅक्क्युलमसह सचिनला टाकले मागे

रोहित शर्मा ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक षटकार ठोकणारा खेळाडू

सलामीवीर रोहित शर्मा आणि अजिंक्य राहणे यांच्या दमदार खेळीनंतर हार्दिक पांड्याने साकारलेल्या बहारदार खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत एकदिवसीय मालिका ३-० अशी खिशात घातली. होळकर मैदानावर रंगलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या २९३ धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि अजिंक्य राहणे यांनी दमदार अर्धशतक झळकावलं. रोहित शर्मा या सामन्यात सहज शतक झळकवणार असे वाटत असताना तो कुल्टर नाईलच्या एका चेंडूवर झेलबाद झाला. बाद होण्यापूर्वी त्याने ६२ चेंडूत ६ चौकार आणि ४ उत्तुंग षटकारांच्या मदतीनं ७१ धावांचे योगदान दिले. कारकिर्दीतील १४ वे शतक हुकले असले, तरी या सामन्यात रोहितनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम रचला.

आतापर्यंतच्या सामन्यात आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १३६ षटकारांपैकी ६५ षटकार त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध लगावले आहेत. यात कसोटी सामन्यात ५, टी-२० मध्ये १२ तर एकदिवसीय सामन्यातील ४७ षटकारांचा समावेश आहे. यापूर्वी न्यूझीलंडच्या ब्रेंडन मॅक्क्युलमने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक ६१ षटकार ठोकले होते. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ६० षटकार मारले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक षटकारांचा पराक्रम आपल्या नावे करणाऱ्या रोहितचा या सामन्यातील रिचर्डसनला मारलेला षटकार अफलातून असाच होता. ९ व्या षटकात त्याने चेंडू होळकर स्टेडियम बाहेर मारल्याचे पाहायला मिळाले.

याशिवाय, रोहित शर्माच्या कारकीर्दीतील हे सर्वात जलद अर्धशतक ठरले. यापूर्वी श्रीलंका दौऱ्यावर त्याने ४३ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात रोहित आणि अजिंक्य रहाणे या जोडीनं १३९ धावांची भागीदारी करुन भारताची स्थिती मजबूत केली. त्यानंतर वरच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येण्याची संधी मिळालेल्या हार्दिक पांड्याने ऑस्ट्रेलियन गोलंदाजी अस्थिर केली. त्याने दमदार अर्धशतक झळकावले. त्यानंतर मनिष पांडे आणि महेंद्रसिंह धोनीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका ३-० अशी जिंकली असून या मालिकेतील सलग विजयानंतर भारतीय संघ आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत अव्वलस्थानी पोहचला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2017 11:20 am

Web Title: rohit sharma breaks world record for most sixes against australia
Next Stories
1 भारताची कसोटी
2 आयसीसीकडून श्रीलंकन क्रिकेटची चौकशी सुरू
3 नीलेशच्या दुखापतीबाबत संभ्रम
Just Now!
X