News Flash

“रोहित टी २० मध्येही द्विशतक ठोकू शकतो”

CSK च्या खेळाडूने व्हिडीओ मुलाखतीत दिलं उत्तर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वन डे क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकेपर्यंत कोणी या प्रकारात हा टप्पा गाठेल असे अनेकांना वाटलंही नव्हतं. पण सचिनने पुरूषांच्या वन डे क्रिकेटमध्ये द्विशतकी खेळी केली. त्यानंतर वन डे क्रिकेटमध्ये अनेक द्विशतके लगावली गेली. भारताचा रोहित शर्मा याने तर वन डेमध्ये तब्बल तीन द्विशतके ठोकली. हाच मुंबईचा ‘हिटमॅन’ टी २० क्रिकेटमध्येदेखील द्विशतक ठोकू शकतो असा विश्वास IPL मध्ये चेन्नईकडून खेळणाऱ्या वेस्ट इंडिजच्या ड्वेन ब्राव्होने व्यक्त केला.

टी २० क्रिकेटमध्ये कोणता खेळाडू द्विशतक झळकावू शकेल असा प्रश्न ड्वेन ब्राव्होला विचारण्यात आला. इएसपीएनक्रिकइन्फोला ब्राव्होने व्हिडीओच्या माध्यमातून मुलाखत दिली. त्यावेळी त्याला हा प्रश्न करण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना ब्राव्हो जराही वेळ न दवडता थेट भारताचा मर्यादित षटकांच्या संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा याचं नाव घेतलं. २०१७ मध्ये श्रीलंकेविरूद्ध रोहितने ४३ चेंडूत ११८ धावा ठोकल्या होत्या. रोहितची टी २० क्रिकेटमधील ती वैयक्तिक सर्वोत्तम धावसंख्या आहे. टी २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या अरॉन फिंचची आहे. झिम्बाब्वेविरूद्ध ७६ चेंडूत १७२ धावांची खेळी त्याने केली होती.

रोहित शर्माच्या नावावर वन डे क्रिकेटमध्ये तीन द्विशतके आहेत. २०१३ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डे कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकावले. त्यानंतर श्रीलंकेविरुद्ध २०१४ मध्ये त्याने दुसरे द्विशतक झळकावले होते. यावेळी रोहितने त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम २६४ धावांची खेळी साकारली. त्यानंतर २०१७ मध्ये श्रीलंकेविरूद्धच त्याने पुन्हा द्विशतक ठोकले. तेव्हा त्याने नाबाद २०८ धावा केल्या होत्या.

रोहित शर्माशिवाय सचिन तेंडुलकर, ख्रिस गेल, मार्टिन गप्टिल आणि वीरेंद्र सेहवाग या खेळाडूंनीही वन डे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने पुरूषांच्या वन डे क्रिकेटमध्ये द्विशतकी खेळीचा श्रीगणेशा केला. त्याने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध द्विशतक झळकावले. त्यानंतर भारताचा धमाकेदार फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने वेस्ट इंडिजविरुद्ध २१९ धावांची तुफानी खेळी केली. वेस्ट इंडिजचा धमाकेदार फलंदाज ख्रिस गेलने झिम्बाब्वेविरुद्ध २१५ धावांची खेळी केली. तर न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलने वेस्ट इंडिजविरुद्ध २३७ धावांची नाबाद खेळी करत द्विशतक ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत स्थान मिळवले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2020 12:08 pm

Web Title: rohit sharma csk all rounder dwayne bravo names batsman who can score a double century in t20is vjb 91
Next Stories
1 “…अन भर मैदानात तो माझ्यावर प्रचंड संतापला”
2 सचिन महान फलंदाज होता, पण… – ब्रेट ली
3 जैवसुरक्षिततेचा दावा अवास्तव!
Just Now!
X