भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरी कसोटी भारताने जिंकली. पहिल्या कसोटीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर पुढील दोन सामन्यात भारताने विजय मिळवला. सलामीवीर रोहित शर्मा, कर्णधार विराट कोहली, फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल यांच्या उत्तम कामगिरीच्या जोरावर भारताने मालिकेत दमदार पुनरागमन केले. त्यांच्या या दमदार कामगिरीचं त्यांना फळ मिळालं. ICCने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत काही खेळाडूंना बढती मिळाली.

IND vs ENG: कुंबळेचा विक्रम मोडणार का? अश्विन म्हणतो…

भारताचा सलामीवीर रोहित शर्मा याला ICCच्या कसोटी क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत टॉप १०मध्ये स्थान मिळालं. त्याला सहा स्थानांनी बढती मिळून तो आठव्या स्थानी विराजमान झाला. यादीत वरील ७ फलंदाजांच्या क्रमवारीत कोणताही बदल झालेला नसून विराट पाचव्या स्थानी कायम आहे. चेतेश्वर पुजारा मात्र दोन स्थानांनी खाली घसरून १०व्या स्थानी पोहोचला आहे.

गोलंदाजांच्या यादीत भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याला ४ स्थानांची बढती मिळाली असून तो तिसऱ्या स्थानी विराजमान झाला आहे. यादीत जसप्रीत बुमराहची एका स्थानाने घसरण झाली असून तो नवव्या स्थानी पोहोचला आहे. याशिवाय इंग्लंडचे दोन अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन यांचीही अनुक्रमे एक आणि तीन स्थानांनी घसरण झाल्याचं दिसत आहे. ताज्या यादीनुसार अँडरसन सहाव्या आणि ब्रॉड सातव्या क्रमांकावर आहे.

दरम्यान, भारत-इंग्लंड यांच्यातील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना अहमदाबादमध्ये ४ ते ८ मार्चदरम्यान होणार आहे.