विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा शाही विवाहसोहळा सोमवारी इटलीत पार पडला. यानंतर या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावरून अनेक खेळाडू आणि सेलिब्रिटींनी ‘विरूष्का’ला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. त्यामध्ये भारताचा फलंदाज रोहित शर्माचे मजेशीर ट्विट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. रोहितने नवदाम्पत्याला लग्नाच्या शुभेच्छा देताना भावी आयुष्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत. ‘विराट मी तुला हजबंड हँडबुक देईन. अनुष्का तुझे आडनाव बदलू नकोस, असे रोहितने या ट्विटमध्ये म्हटले आहे. रोहितचेही आडनाव शर्मा असल्याने त्याने अनुष्कालाही शर्मा हे नाव बदलू नकोस असा गमतीत सल्ला दिला आहे. सध्या श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. विराटने या मालिकेतून विश्रांती घेतली असल्याने रोहितवर कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.