भारताने अखेरच्या वन-डे सामन्यात विजय मिळवत मालिकेत २-१ ने बाजी मारली. भारताकडून ‘हिटमॅन’ रोहित शर्माने आव्हानाचा पाठलाग करताना धडाकेबाज शतक ठोकले. त्याला कर्णधार विराट कोहलीच्या झंजावाती अर्धशतकी खेळीची जोड मिळाली, त्यामुळे ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेलं २८७ धावांचं आव्हान भारताने ३ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं.

हिटमॅन रोहित शर्माने दमदार खेळी करत ११९ धावा लगावल्या. १२८ चेंडूच्या खेळीत त्याने ८ चौकार आणि ६ षटकार ठोकले. त्याच्या खेळीमुळे भारताच्या विजयाची पायाभरणी झाली. पण त्याच्या खेळीनंतरचा एक व्हिडीओ सध्या जास्त चर्चेत आहे. रोहित ड्रेसिंग रूममध्ये असताना आपली लेक समायरा हिच्याशी खेळत असतानाचा तो व्हिडीओ आहे. तो ड्रेसिंग रूममध्ये उभा होता आणि बाटलीतून पाणी पित होता. त्यावेळी लेक समायरा हिला त्याच बाटलीतून पाणी हवं होतं. पण रोहितने मात्र तिला बाटली दिली नाही. तिच्याशी धमाल मस्ती करतानाचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

शतकासह रोहितने केली विराटशी बरोबरी

भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा याने नवीन वर्षात आपलं पहिलं-वहिलं शतक झळकावलं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या वन-डे सामन्यात रोहितने कांगारुंच्या गोलंदाजांचा समाचार घेत आपल्या वन-डे कारकिर्दीतल्या २९ व्या शतकाची नोंद केली. रोहितने आधी लोकेश राहुल आणि त्यानंतर विराट कोहलीसोबत महत्वपूर्ण भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे क्रिकेटमधलं रोहितचं हे आठवं शतक ठरलं. या शतकी खेळीसह रोहितने विराटशी बरोबरी केली आहे. या दोन फलंदाजां व्यतिरीक्त सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९ शतकं झळकावली आहेत.

भारताने जिंकला तिसरा सामना

२८७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि लोकेश राहुल सलामीला उतरले. पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत त्यांनी चांगली सुरूवात करून दिली. लोकेश राहुल माघारी परतल्यानंतर विराट आणि रोहित जोडीने कांगारुंच्या नाकी नऊ आणले. रोहित आणि विराट बाद झाल्यावर श्रेयस अय्यर आणि मनिष पांडे जोडीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याआधी, स्टिव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन या फलंदाजांनी केलेल्या आश्वासक खेळामुळे कांगारुंनी अखेरच्या वन-डे सामन्यात २८६ धावांपर्यंत मजल मारली.