ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरच्या वन-डे सामन्यात केलेल्या शतकी खेळीचा रोहित शर्माला चांगलाच फायदा झालेला दिसतोय. ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका ४-१ ने जिंकल्यानंतर आयसीसीने आपली नवीन क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीत रोहित शर्माने फलंदाजांच्या यादीत पाचवा क्रमांक पटकावला आहे. नवव्या क्रमांकावरुन रोहित आता पाचव्या क्रमांकावर आला आहे. तर भारताचा कर्णधार विराट कोहलीने आपलं पहिलं स्थान कायम राखलं आहे.

विराट आणि रोहितव्यतिरीक्त पहिल्या १० जणांमध्ये एकाही भारतीय फलंदाजाला स्थान मिळालेलं नाहीये. मात्र पहिल्या २० जणांमध्ये भारताच्या दोन फलंदाजांना स्थान मिळालं आहे. १२ व्या क्रमांकावर महेंद्रसिंह धोनी आणि १४ व्या क्रमांकावर शिखर धवनला जागा मिळाली आहे. तर गोलंदाजांच्या यादीत भारताचा जसप्रीत बुमराह पाचव्या स्थानावर आणि अक्षर पटेल आठव्या स्थानावर आहे. याव्यतिरीक्त भुवनेश्वर कुमार हा भारताचा एकमेव गोलंदाज १४ व्या स्थानावर आहे. याचसोबत वन-डे क्रमवारीतही भारत पहिल्या क्रमांकावर आहे.

आयसीसी वन-डे क्रमवारीत भारताचे फलंदाज –

१) विराट कोहली – ८७७
५) रोहित शर्मा – ७९०
१२) महेंद्रसिंह धोनी – ७३८
१४) शिखर धवन – ७१५

आयसीसी वन-डे क्रमवारीत भारताचे गोलंदाज –
५) जसप्रीत बुमराह – ६७१
८) अक्षर पटेल – ६६३
१४) भुवनेश्वर कुमार – ६२६

याव्यतिरीक्त अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिल्या २० जणांत भारताच्या केवळ एकाच खेळाडूला जागा मिळाली आहे. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका खेळायना न मिळाल्याने रविंद्र जाडेजा १९ व्या स्थानावर घसरला आहे.