अत्यंत रंगतदार अवस्थेत पोचलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसऱ्या टी-२० सामन्यात सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या दोन चेंडूंवर दोन षटकार ठोकत भारताला विजय मिळवून दिलेल्या रोहित शर्मानं विजयी षटकारामागचं रहस्य सांगितलं आहे. सामना संपल्यानंतर बोलताना रोहित म्हणाला की, पहिल्या चेंडूपासून आक्रमण करायचं की एकेरी दुहेरी धावेवर भर द्यायचा हा प्रश्न होता. मी यावेळी गोलंदाजानं चूक करण्याची वाट बघण्याचं ठरवलं असं त्यानं सांगितलं.

सुपर ओव्हरमध्ये भारताला जिंकण्यासाठी १८ धावा हव्या होत्या. के. एल. राहूलनं मारलेल्या एका चौकाराखेरीज एकही मोठा फटका दोघांनाही चार चेंडूंमध्ये खेळता आला नव्हता. त्यामुळे चार धावांमध्ये अवघ्या आठ धावा झाल्या व शेवटच्या दोन चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी १० धावांची गरज होती. गोलंदाज सौदी टिच्चून गोलंदाजी करत होता. मात्र रोहितला अपेक्षित असलेली चूक सौदीनं केली आणि त्यानं पाचवा चेंडू ओव्हर पिच टाकला, ज्यावर रोहितनं लाँग ऑनला उत्तुंग षटकार ठोकला. शेवटच्या चेंडूवर जिंकण्यासाठी भारताला चार धावा हव्या असताना पुन्हा सौदीनं ओव्हरपिच पण यावेळी ऑफ स्टम्पच्या बाहेर चेंडू टाकला जो रोहितनं लाँग ऑफच्या बाहेर भिरकावत सहा धावा वसूल केल्या व भारतानं सामन्यासह मालिका जिंकली.

पहिल्या दोन सामन्यांमध्ये अपयशी ठरलेल्या रोहितनं महत्त्वाच्या सामन्यामध्ये एक भरवशाचा खेळाडू म्हणून आपल्याकडून अपेक्षा होत्या त्या पूर्ण करण्यात यशस्वी ठरल्याची भावना व्यक्त केली.