रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं विजेतेपद पटकावल्यानंतर, भारतीय संघाच्या टी-२० संघाचं कर्णधापद रोहितकडे सोपवण्यात यावं या मागणीला जोर धरायला लागला. अनेक दिग्गज माजी खेळाडूंनी रोहितच्या खेळाचं कौतुक करत त्याने टी-२० संघाचं नेतृत्व करायला हवं अशी मागणी केली.

अवश्य वाचा – IPL च्या निकषावरुन खेळाडूंची संघात निवड होते मग कर्णधाराची का नाही?

विराट कोहलीच्या RCB संघातला सहकारी पार्थिव पटेलनेही या चर्चेत आपलं मत नोंदवत चक्क रोहित शर्माच्या पारड्यात आपलं मत टाकलं आहे. “माझ्या मते आपण आता अशा गोष्टीवर चर्चा करत आहोत की, सगळ्यात चांगले निर्णय कोण घेतं, सामन्याचं पारडं कुठे झुकतंय याचा अंदाज कोणाला चांगला येतो, दबावाखाली मॅच विनींग निर्णय कोण घेतं?? माझ्या मते या सर्व निकषांचा विचार केला तर रोहित विराटपेक्षा काकणभर सरस आहे.” पार्थिव Star Sports वाहिनीच्या Cricket Connected कार्यक्रमात बोलत होता.

दरम्यान या चर्चेत सहभागी झालेल्या गौतम गंभीरनेही आयपीएलमधल्या कामगिरीच्या निकषावर जर भारतीय संघात खेळाडूची निवड होणार असेल तर मग कर्णधारपदासाठी हा नियम का लावायचा नाही?? असा प्रश्न विचार केला. तर आकाश चोप्राने सध्या कर्णधारपदात बदल करुन नव्याने संघ तयार करण्याची वेळ नसल्याचं सांगितलं.

अवश्य वाचा – Ind vs Aus : कसोटी मालिकेत रोहित-इशांतच्या सहभागाबद्दल अनिश्चीतता कायम